काढणीला आलेला कांदा, गव्हू झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग
खोडद : सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यातील शेतीमालाचे मोठे नुकसान झाले. यात प्रामुख्याने द्राक्ष, कांदा व गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वातावरणात सतत होणारे बदल, अस्मानी संकट यामुळे बळीराजा अधिकच आर्थिक संकटात सापडला गेला आहे.
आजच्या अवकाळी पावसापासून गहू व कांदा वाचविण्यासाठी गहू व कांदा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक झाली.
रब्बी पिकांची काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मार्च महिना अंतिम टप्प्यात आला असतानाही अवकाळी पाऊस सुरुच असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, द्राक्षे यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कांदा, टोमॅटो, मिरची यासारख्या नगदी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा, कलिंगड तसेच द्राक्षाच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्याचबरोबर घरगुती आंब्याच्या झाडांचे मोहोर गळून देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
जुन्नर तालुक्यातील सुमारे ८० टक्के द्राक्षांची तोडणी झली असून राहिलेल्या २० टक्के द्राक्षांना या अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे ही द्राक्ष स्थानिक बाजार पेठांमध्ये कमी भावाने विक्री करावी लागली.अवकाळी पावसामुळे आधीच झालेले द्राक्षांचे नुकसान व कोरोनामुळे बाहेरील देशांमधून द्राक्षांना मागणी न झाल्याने ५० ते ६० रुपये प्रति किलो बाजार भावाप्रमाणे द्राक्ष विक्री करावी लागली.
जुन्नर तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांनी १ हजार ५०० हेक्टर मध्ये द्राक्षांचे , ४ हजार ५०० हेक्टर मध्ये गव्हाचे तर ९ हजार हेक्टर मध्ये कांद्याचे उत्पादन घेतले आहे.काढणीला आलेला गव्हू आणि कांदा यांना मोठा फटका बसणार आहे.
२०२० मध्ये निसर्गाचा ,वातावरणाचा व पावसाचा समतोल न राहिल्याने द्राक्षांच्या बागांमधील घड निर्मितीचे प्रमाण घटल्याने दरवर्षी पेक्षा यावर्षी द्राक्षांचे केवळ ५० टक्केच उत्पादन घेण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे,यामुळे आधीच अडचणीत सापडलेले द्राक्ष उत्पादक शेतकरी आता अधिक संकटात सापडले आहेत. ================================ "आज अचानक आलेल्या अवकाळी पावसाने परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. काढणीला आलेला गहू, कांदा,हरभरा, द्राक्ष, टोमॅटो व मिरची यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.मागच्या वर्षी देखील कोरोना आणि अस्मानी संकटामुळे शेतकरी अक्षरशः झोपला गेला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे." -.योगेश जालिंदर डोंगरे,
शेतकरी, खोडद,
खोडद येथे अवकाळी पावसामुळे कांदा भिजू नये म्हणून शेतकऱ्याने ताडपत्री टाकून झाकलेला हा कांदा.