पुणे : भारत- पाकिस्तान यांच्यात १९६५ साली झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजविणारे पी.व्ही. सरदेसाई यांचे पुण्यात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, पौलोमी आणि मुलगा वीर असा परिवार आहे. पुण्याचे धन्वंतरी म्हणून प्रसिद्ध असलेले कै. डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे ते धाकटे बंधू होते.
भारत- पाकिस्तान १९६५ साली झालेल्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले होते. त्यांची तूकडी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून लाहोरचा दरवाजा ठोठावून आली होती. याप्रसंगी त्यांना एक महत्वपूर्ण संदेश मिळाला होता जो इतर रणगाड्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक होते. पण दूरसंचाचा संपर्क तुटला होता. अशावेळी तो देण्यासाठी आपल्या जीवाची तमा न बाळगता ते रणगाड्यातून उतरले व अविरत बॉम्ब हल्ल्यातून बचाव करत मार्ग काढत इतर सैन्यापर्यंत तो संदेश पोहचवला. परत येत स्वतःच्या रणगाड्यात चढत असताना जवळच एका बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. बॉम्बचे काही तुकडे पाठीच्या कण्यातही घुसले. शस्त्रक्रिया करून ते काढले असते ते कायमचा अर्धांगवायू होण्याचा धोका होता. संपुर्ण कारकीर्द त्यांनी या वेदना सहन करत ते देशाच्या सेवेत राहिले. आणि मेजर जनरलच्या हुद्द्यापर्यंत त्यांची पदोन्नती झाली.