लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिल्लीतील मेजर वसंत किलारी याने तमिळनाडूतील मेजर थिरू थंगवेल याला २५ लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी तिघांना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
मेजर वसंत विजय किलारी (वय ४५, रा. दिल्ली, मूळ आंध्र प्रदेश), मेजर थिरू मुरुगन थंगवेलू (वय ४७, रा. वेलिंग्टन, तमिळनाडू) आणि भारत लक्ष्मण अडकमोळ (वय ३७, रा. पाचोरा, जि. जळगाव) यांना येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केली.
महेंद्र सोनवणे, अलीअख्तर खान हे एक्स सर्व्हिसमन तसेच आजाद खान हा सैन्यात कूक आहे. किशोर गिरी याला सैन्याची भरती परीक्षेची कार्यपद्धती माहिती आहे. तो पुणे, बारामती, फलटण, वडूज, इस्लामपूर, भुईंज, पुसेगाव, रहिमतपूर, कराड, सोलापूर, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, बेळगाव या ठिकाणी भरती अकादमी चालवतो. तसेच त्याने ‘फ्रँचायजी’ दिल्या आहेत. परीक्षेचे पेपर परीक्षेच्या एक दिवसांपूर्वी देतो, असे सांगून किशोर गिरी त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये शुल्क आकारतो.
भारत अडकमोळ याला मेजर थिरू थंगवेल याच्याकडून रिलेशन भरती प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर पाठविली गेली. थिरू थंगवेल याला दिल्लीतील मेजर वसंत किलारी याने ती प्रश्नप्रत्रिका पाठविली होती. किलारीला पवन नायडू याने ती पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पवन नायडू हा व्यावसायिक असून तो गुन्हा घडल्यापासून फरार आहे. त्याला लष्करातून ही प्रश्नपत्रिका कोणी पाठविली, त्याचा तपास सुरू आहे.
चौकट
परीक्षार्थींकडून घेतले प्रत्येकी १ लाख
थिरू थंगवेलू याने आर्मी रिलेशन भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्याच्या बदल्यात वसंत किलारी याला रोख २५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार वसंत किलारीने थिरू थंगवेलला प्रश्नप्रत्रिका पाठविली. थिरूने ती अडकमोळ याला पाठविली़ अडकमोळ याने ती इतरांना पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वसंत किलारी याला पवन नायडू याने ही प्रश्नपत्रिका पाठविली होती. नायडू हा फरार असल्याने त्याला ही प्रश्नपत्रिका कोणी पाठविली होती, याचा शोध सुरू आहे.
तपासादरम्यान, पुंडलिक सहाणे (रा. श्री ओम साई करिअर अॅकॅडमी, वडाचीवाडी) व अरविंद चव्हाण (रा़ महाड) यांचाही त्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. अटक आरोपींशी त्यांनी संगनमत करून हा गुन्हा केला आहे.
सातारा येथील एका प्रशिक्षार्थीने दिलेल्या फिर्यादीवरून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रशिक्षणार्थीने दिलेल्या १ लाख रुपयांपैकी १० हजार रुपये महेंद्र सोनवणे याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित ९० हजार रुपये हस्तगत करायचे आहेत. न्यायालयाने तीनही आरोपींना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पुणे पोलीस आर्मी रिलेशन परिक्षेतील पेपरफुटीच्या तपासात एक एक गुंता सोडवित प्रश्नपत्रिका सर्वप्रथम कोणी फोडली, या दिशेने जात आहे. त्यातूनच व्यावसायिक पवन नायडूपर्यंत धागेदोरे पोहचले असून त्याच्याकडे ही प्रश्नपत्रिका कोणी पाठविली, याचा शोध सुरू आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे अधिक तपास करीत आहेत.