नितीश गोवंडे
पुणे : पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी येथील एका कारखान्यावर पुणेपोलिसांचा छापा मारून ११०० कोटी रुपयांचे ६०० किलो पेक्षा अधिकचे एडमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अनेक जण ताब्यात घेतले असून आजवरच्या इतिहासात पुणे पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे. अनिल साबळे नामक कारखाना मालकाला पोलिसांनी डोंबिवली इथून सकाळी ताब्यात घेतले आहे. कुरकुंभ एमआयडीसी मध्ये यापूर्वी देखील अनेकवेळा अश्या धाडी टाकण्यात आल्या असुन अजून यामध्ये किती कंपन्या अश्या प्रकारे बेकायदेशीर ड्रग बनवण्याचे काम करीत आहेत. हे पाहणे गरजेचे झाले आहे.
शहरासह देशभरातील विविध शहरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांची छापेमारी सुरू आहे. कुरकुंभ येथील कारखाना मालक व केमिकल एक्स्पर्ट पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आता पर्यंत तीन कारवाया 600 किलोहून अधिक एमडी जप्त करण्यात आले आहे.
सोमवारी अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त करून तीन आरोपींना अटक करण्यात पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेला यश आले होते. ही कारवाई सोमवारी (दि. १९) करण्यात आली. आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल साडेतीन कोटींचे मेफेड्रॉन (एमडी) हे ड्रग्ज हस्तगत केले होते. यापूर्वी २०२३ मध्ये ड्रग्ज तस्कर ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांकडून ससून रुग्णालयाच्या परिसरात सव्वादोन कोटी रुपयांचे एमडी जप्त केले होते. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणातील ही कुरकुंभ एमआयडिसीतील सर्वांत मोठी कारवाई आहे.
पुणे पोलिसांचा ड्रग फ्री पुणे या मोहिमेचा प्रारंभ
पोलिसांनी ड्रग फ्री पुणे या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात येते आहे. रॅकेटची पाळेमुळे खोदण्यासाठी दहा पथके तैनात केली आहेत. या कामात आम्हाला पुणेकरांचे सहकार्य अपेक्षित आहे. ड्रग्जच्या संदर्भात माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. यासाठी आम्ही ८९७५९५३१०० हा मोबाईल क्रमांक देत आहोत. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त