पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या बापावर मुलाला चारचाकी वाहन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता, तर दोघांचा जीव घेणाऱ्या त्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयाने काही अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला होता.
अल्पवयीन मुलाला जामीन देताना बाल न्याय मंडळाने त्याला पंधरा दिवस येरवडा विभागातील ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचे नियोजन करावे. अपघातावर त्याने निबंध लिहावा या अटी, शर्तीवर जामीन दिला. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची बैठकही घेतली होती. त्यानंतर पोलिसांकडून पुन्हा बाल हक्क न्यायालयात अपिल करण्यात आली. त्यावर बाल हक्क न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पुणे अपघातप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला बालसुधारगृहात ठेवणार असल्याचे कोर्टाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्या सुधारगृहात तो सज्ञान कि अज्ञान हे ठरणार आहे.
विशाल अग्रवालला ३ दिवसाची पोलीस कोठडी
पुणे अपघातानंतर विशाल पसार झाला होता. त्याला छत्रपती संभाजीनागमधून ताब्यात घेण्यात आले होते. आज त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी सरकारी वकिलामार्फत युक्तीवाद केला. त्यामध्ये ब्लॅक पब चे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिप ने अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला. विशाल अगरवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले? ते जेव्हा संभाजी नगर मध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? या सगळ्या गोष्टीसाठी तपास करण्यासाठी सरकारी वकील यांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करत ३ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.