पुणे : साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान, पुणेतर्फे आयोजित २३ वे साहित्यिक कलावंत संमेलन दिनांक २३, २४ आणि २५ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. त्यानिमित्त यंदा साहित्य क्षेत्रासाठीचा वाग्यज्ञे पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांना आणि कला क्षेत्रासाठीचा कलागौरव पुरस्कार प्रसिध्द विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांना जाहीर करण्यात आला. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने याची घोषणा करण्यात आली.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित या संमेलनात रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.३० (साडेपाच) वाजता, प्रसिद्ध साहित्यिक आणि अंमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
लक्ष्मीकांत देशमुख हे प्रशासनातून आयएएस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. आजवर त्यांची विविध विषयांवरील ३१ मराठी, पाच इंग्रजी आणि दोन हिंदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. २०१८ मध्ये बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. 'इन्कलाब विरुद्ध जिहाद', 'हरवलेले बालपण', 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी', 'गाव विकणे आहे', 'मधुबाला ते गांधी' ही त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत.
यंदाच्या 'वाग्यज्ञे' साहित्य व कलागौरव पुरस्काराचे दुसरे मानकरी मकरंद अनासपुरे यांनी आजपर्यंत ५० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. 'गाढवाचं लग्न', 'दे धक्का', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा', 'गुलदस्ता' हे त्यांचे अधिक गाजलेले चित्रपट आहेत.