माधव जोशी म्हणाले, की आपल्या संस्कृतीमध्ये स्थापत्य, साहित्य, चित्र, काव्य, कला अशा अनेक माध्यमांतून इतिहासाचे अस्तित्व आणि भव्यता सामावली आहे. मात्र, याबाबत निष्ठेने व श्रद्धेने होणारा अभ्यास कमी होऊ लागला आहे. ठराविक लोकांकडेच माहिती उपलब्ध असते. ही माहिती फक्त स्वत:जवळ ठेवून मारण्यापेक्षा इतरांना देऊन प्रवाहित करणे जास्त योग्य ठरू शकते. प्रवाहित असणाऱ्या माहितीमुळे त्यामध्ये अधिकाधिक संशोधन होऊ शकते. त्याचा परिणाम असा, की हे संशोधन सत्याच्या जवळ जाण्यास मदत करेल. बारामतीमधील कविवर्य मोरोपंतांच्या आर्यांशिवाय त्या काळात कीर्तन रंगत नसे. अहंकार दुखावल्याने पेशव्यांनी दोन वर्षांकरिता मोरोपंतांच्या आर्या कीर्तनात वापरण्यास बंदी घातली. मात्र, त्याचा परिणाम कीर्तनकारांवर झाला. कीर्तनकारांनी पेशव्यांना आर्या म्हणू देण्याची विनंती केली. त्याशिवाय कीर्तन रंगत नसल्याचेही सांगितले.शेवटी पेशव्यांनी आपला बंदी हुकूम मागे घेतला. मोरोपंतांचे काव्य आणि त्यांच्या आर्या मराठी भाषेचे एक अभिजात स्वरूप आहेत. मात्र, याच मोरोपंतांच्या काव्याचा अभ्यास त्यामानाने केला गेला नाही. फक्त मुंबई विद्यापीठामध्ये त्यांच्या साहित्यासाठी एक कक्ष आहे. हे उदाहरण देण्याचे कारण म्हणजे, अशा अनेक ऐतिहासिक साहित्य आणि अवशेषांबद्दल शासकीय, राजकीय, सामाजिक उदासीनता मोठी आहे. त्याबाबत विचार करणे सोडाच; परंतु कोणी बोलतदेखील नाही.कित्येक ऐतिहासिक स्थळे की जी आपला देदीप्यमान इतिहास अंगाखांद्यांवर मिरवत आहेत, आज ती अखेरच्या घटका मोजत आहेत.गावागावांमध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा दिसतात. ऐतिहासिक शोधकार्य फक्त इतिहास अभ्यासकांपुरतेच मर्यादित न राहता, सहजगत्या सर्वसामान्यांच्या भाषेत पुढे यायला हवे. हेमाडपंती मंदिरे व त्याभोवती असणाऱ्या भग्नावशेषांमधून त्या-त्या परिसराच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडण्यास मदत होईल. यातून खऱ्या अर्थाने त्या वेळचा समाज आणि कार्यपद्धती पुढे येईल.वारसास्थळांचे महत्त्व व त्याचा इतिहास सांगिल्यास त्यांच्या ऐतिहासिक जाणिवा तयार होतील. भारत इतिहास संशोधक मंडळ आणि इतिहासतज्ज्ञांनी या युवकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. इतिसाहस संशोधक संस्थांमधून शेकडो ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध आहेत. संशोधनासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी संयम, अभ्यासू वृत्ती आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. यासाठी सुजाण नागरिकांनी पुढे आले पाहिजे. पुणे जिल्ह्याच्या कोणत्याही गावात गेले तरी तेथे एखादे का होईना, हेमाडपंती मंदिर अढळते. ही मंदिरे ६०० ते ७०० वर्षे जुनी, तर काही मंदिरे अगदी हजारो वर्षे जुनी आहेत. स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणून आजही हीमंदिरे ओळखली जातात. त्यांची रचना, त्यांवरील कलाकुसर, तंत्र याबाबत सर्वसामन्यांना माहिती नसते. त्यामुळे अनेक वेळा अज्ञानातून स्थानिकांकडूनच या वास्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे थांबायला हवे. ऐतिहासिक वास्तूंबद्दल अभिमान वाटायला हवा. त्यांचे महत्त्व स्थानिकांना सर्वांत आधी पटवून सांगायला हवे. तसे केल्यास पर्यटकांकडून होणारे नुकसान टळेल. स्थानिक व्यक्तीच अशा प्रकारांना आळा घालतील. आपल्या परिसरातील अनेक ऐतिहासिक ठिकाणे चांगली पर्यटनस्थळे म्हणून समोर येऊ शकतात. शासन, प्रशासन, स्थानिक नागरिक आणि सुजाण युवक यांच्यावरच ही भिस्त आहे.
इतिहासाबद्दल आपुलकी निर्माण करावी
By admin | Published: May 23, 2017 5:01 AM