पुणे : मोहसीन शेख हत्येप्रकरणी अटकेत असलेले धनंजय जयराम देसाई (वय ४० रा. हिंदूगड, पौड ता. मुळशी) यांना जामीन न देण्याबाबतच्या कारणांचा सरकार पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयाने दाखल करून घेतला असून, त्यावर सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले आहे. देसाई यांच्या वतीने मिलिंद पवार व भालचंद्र पवार यांनी विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्यासमोर दाखल केला. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. पुढील सुनावणी ५ मे २०१७ रोजी होणार आहे. देसाई हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख आहेत, म्हणून त्यांना फक्त कारागृहात ठेवले आहे काय? मुख्य आरोपी जामिनावर सुटूनही सरकारी पक्ष देसाई यांच्या जामिनाला विरोध करत आहे. या सर्व गोष्टींचा खुलासा सरकारकडून मागविण्यात यावा, असे या अर्जात नमूद आहे. या खटल्यात सरकारने विशेष सरकारी वकिलांची नेमणूक केली आहे व मुख्य १७ आरोपी जामिनावर आहेत. खटला सुनावणीसाठी प्रलंबित आहे. गेली ३ वर्षे देसाई कारागृहात आहेत व घटनेच्या वेळी देसाई हे घटनास्थळी हजर नव्हते. कुठलाही सबळ पुरावा नसताना देसाई यांना कारागृहात डांबून ठेवले आहे, असे अर्जदारांचे म्हणणे आहे.
देसाई जामीनप्रकरणी म्हणणे मांडावे
By admin | Published: April 24, 2017 5:09 AM