धायरी : सिंहगड रस्ता तसा आधीच गजबजलेला रस्ता असल्याने शिवाय नऱ्हे, धायरी, नांदेड गाव, किरकटवाडी, खडकवासला अन्य भागातील राहणाऱ्या नागरिकांना मुख्य रस्त्याने जावे लागते. तसेच पर्यायी रस्ता नसल्याने त्यांना दररोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी ते वारजे पुलापर्यंत नदीपात्रातून २४ मीटरचा रस्ता एलिव्हेटेड उड्डाणपूल म्हणून विकसित करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका ज्योती गोसावी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शनिवारी एका खासगी कामासाठी हिंगणे खुर्द परिसरात आले होते. यावेळी प्रभाग क्रमांक ३४ मधील नगरसेवक प्रसन्न जगताप, नगरसेविका मंजूषा नागपुरे, नगरसेविका ज्योती गोसावी, नगरसेवक श्रीकांत जगताप आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सर्व नगरसेवकांनी श्री क्षेत्र विठ्ठलवाडी ते वारजे पुलापर्यंत नदीपात्रातून २४ मीटरचा रस्ता एलिव्हेटेड उड्डाणपूल करावा, अशी मागणी केली. सुरुवातीला नदीपात्रातील रस्ता विकसित करण्याकरिता हरित लवादाची ‘स्टे ऑर्डर’ होती. मात्र त्यानंतर न्यायालयाने या ठिकाणी एलिव्हेटेड उड्डाणपूल करण्यास परवानगी दिली आहे. प्रभाग क्रमांक ३४ मधील राजाराम पूल ते धायरी फाटा या मुख्य रस्त्यावर सकाळी व सायंकाळी मोठी वाहतूककोंडी होते. यासाठी पर्यायी रस्ता म्हणून वारजे, सनसिटी, आनंदनगर,नांदेड सिटी, अशा विविध भागातील नागरिकांना याचा उपयोग होईल. यावेळी नवले पुलाजवळ वारंवार होणाऱ्या अपघातांवर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.
कोट
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पूल परिसरात सतत होणाऱ्या अपघाताबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने ठोस उपायोजना करण्यात याव्यात, याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
- प्रसन्न जगताप, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती
श्री क्षेत्र विठ्ठलवाडी ते वारजे पुलापर्यंत नदीपात्रातून २४ मीटरचा रस्ता एलिव्हेटेड उड्डाणपूल झाल्यास सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय एलिव्हेटेड उड्डाणपूल करण्यास हरित लवादानेही मान्यता दिली आहे.
- ज्योती गोसावी, नगरसेविका
सिंहगड रस्त्यावर सतत वाहतूककोंडी होत असते. यासाठी या भागात पर्यायी रस्ते करणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर महामार्गावरील अपघातांची मालिका थांबविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- मंजूषा नागपुरे, नगरसेविका