लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्हा रोजगार हमी योजना मुक्त जिल्हा म्हणून ओळखला जायचा. मात्र रोहयो अंतर्गत कामे देण्यासाठी १०० दिवस काम ही योजना जिल्ह्यात राबवली जात आहे. कुशल आणि अकुशल कामे मजुरांना देऊन त्या अंतर्गत प्रत्येकाला लखोपती बनवण्याचा मानस आहे. या साठी १०० दिवस रोजगार उपलबद्ध होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे, असे मत राज्याचे रोजगार हमी योजनेचे तसेच मृदा आणि जलसंधारण विभाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात नरेगा अंतर्गत सरपंच, ग्रामसेवकांच्या कार्यशाळेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणूण नंद कुमार बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, रोजगार हमी योजनेच्या उपायुक्त नैना बोंदारडे, उपजिल्हाधिकारी संजय तेली, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम, गटविकास अधिकारी स्नेहा देव आदी यावेळी उपस्थित होते.
नंद कुमार म्हणाले की, जिल्ह्यात रोजगार हमी योेजने अंतर्गत रोजगार उपलबद्ध करून देण्याची मोठी क्षमता आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात गोदामे बांधल्यास याचा फायदा शेतकऱ्यांना त्यांचा माल ठेवायला होईल. या योजनेच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्त्याची कामे केल्यास शेतकऱ्यांना त्यांचा माल वेगाने बाजारपेठेत पोहोचवता येईल. यासोबतच शेतात विहीरी तसेच कायमस्वरूपी सिंचन सुविधा निर्माण केल्यासही या योजनेच्या माध्यमातून बागायत शेती करून उत्पादन वाढवता येऊ शकते. यासाठी ग्रामपंचायतीने, तसेच ग्रामसेवक, गटविकास अधिकाऱ्यांनी १०० दिवस रोजगार उपलबद्ध करून देण्याची हमी देणे गरजेचे आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, खरीप आणि रब्बी हंगाम संपला आहे. यामुळे येत्या काळात शेतजमिनी पडीक राहणार आहेत. त्यासोबतच अनेकांना काम उरणार नसल्याने बेरोजगारी वाढणार आहे. शेतातील कामे सुरू होण्यास आता १०० ते १२० दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीत रोहयोच्या माध्यमातून कामे दिली जाणार आहे. २७५ प्रकारच्या कामांची यादी तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून कामे दिल्यास दारिद्रयरेषा कमी करता येणे शक्य आहे. ही कामे करताना कुशल-अकुशलची मर्यादा सांभाळायची आहे.
प्रास्ताविक आशिष जराड यांनी केले, तर आभार रोहयोच्या गटविकास अधिकारी स्नेहा देव यांनी मानले.
चौकट
रोहयोच्या माध्यमातून शाळांची, पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य
रोजगार हमी योजनेतून कामे करण्यासाठी जिल्ह्यातील शाळांनी तयारी दर्शवली आहे. जवळपास ३ हजार ४६० शाळांनी याला प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक कामाला लेबर बजेट मध्ये घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. हर घर गोठे या योजनेद्वारे रोहयो अंतर्गत प्रत्येक घरात गोठे उभारले जाणार आहे. पाणंद रस्त्याच्या माध्यमातून शेतात रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. शेतमाल साठवणूकीसाठी प्रत्येक गावात गोदामे या योजनेतून बांधली जाणार आहे. याचा फायदा गावाला तसेच शेतकऱ्यांनाही होणार आहे.
-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी
फोटो : रोजगार हमी योजने अंतर्गत सरपंच, उपसरपंच यांना प्रशिक्षण देतांना नंदकुमार आणि आयुष प्रसाद.