शिरूर : ‘हरित बना’ (गो ग्रीन) हा आपल्या दैनंदिन जीवनातला भाग बनवा व याची स्वत:पासून सुरुवात केली तर संपूर्ण जग हरित होण्यास वेळ लागणार नाही, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी येथे व्यक्त केले. यासाठी नव्या पिढीला उद्युक्त करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. जगाच्या पाठीवर सध्या भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांपैकी औद्योगिकीकरण व त्यामुळे निर्माण होणारी कीटकनाशके, रासायनिक खते, प्लॅस्टिकनिर्मिती, पाणी, मातीचे प्रदूषण अशा निर्माण होत चाललेल्या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय ‘गो ग्रीन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी डॉ. शिंदे बोलत होते. ‘कोरियन असोसिएशन फॉर ग्रीन कॅम्पस’ इनिशिएटिव्हचे अध्यक्ष प्रा. डॉ. यून हे कीम यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तिरुपती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दामोदरम, प्रा. डॉ. श्रीनिवास, स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव मा. प्राचार्य नंदकुमार निकम, बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, परिषदेचे समन्वयक प्रा. डॉ. बी. आर. खोत, फोटोग्राफी व पब्लिकेशन विभागाचे समन्वयक प्रा. डी. एच. बोबडे, संशोधन करणारे प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. डॉ. शिंदे म्हणाले, हरित बनण्यासाठी हरित विचार व हरित आचारण करणे गरजेचे आहे. प्रदूषणाविषयी ते म्हणाले, आपली जीवनपद्धती प्रदूषणाच्या समस्येला कारणीभूत आहे. गरजा मर्यादित करणे, साधनसामग्रीचा योग्य वापर याचा अवलंब करताना कचरा कमी करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. आपला आनंदोत्सव समाजासाठी त्रासदायक ठरता कामा नये. आपले जीवन मनी (पैसा) केंद्रीत नव्हे, तर आरोग्यकेंद्रीत असले पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. डॉ. दामोदर यांनी पाणी व ऊर्जा याचे महत्त्व विषद करताना या दोन्ही घटकांचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली. उघड्यावरील डंपिंग कचरा, प्लॅस्टिक कचरा, पर्यावरणविषयक कायदे व नियमांचा अभाव याविषयी चिंता व्यक्त केली. हरित बनण्यासाठी (गो ग्रीन) पर्यावरणपूरक विचार अंगिकारण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मा. प्राचार्य निकम यांनीही गो ग्रीनसाठी प्रत्येकाने मनाने हरित बनण्याची अपेक्षा व्यक्त केली. यासाठी जबाबदार नागरिक बनून दुसऱ्यांनाही या जबाबदारीचीजाणीव करून दिली पाहिजे. आपल्या देशात ३६५ दिवस सूर्याचा लख्ख प्रकाश आपल्याला मिळतो. मात्र, त्याचा आपण किती योग्य वापर करतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. चीन, श्रीलंकेत ज्याप्रमाणे गो ग्रीनसाठी पावले उचलली गेली. त्याप्रमाणे आपल्या देशातही तशी पावले उचलली गेली पाहिजे, अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली. परिषदेचे आयोजक प्राचार्य डॉ. मोहिते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. एन. एम. घनगावकर यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेचे समन्वयक प्रा. खोत यांनी आभार मानले. (वार्ताहर)
‘गो ग्रीन’ जीवनाचा भाग बनवा
By admin | Published: January 13, 2017 1:55 AM