पुणे : कसबा मतदारसंघात यापूर्वी जे काय झाले ते विसरून जा, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. एकीचे बळ काय ते दाखवून द्या. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात ते दाखवून दिले. आता या निवडणुकीच्या माध्यमातून इतिहास घडवूया, असे आवाहन विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून सन्मानाने जागा वाटप करू, असे सांगून आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार संग्राम थोपटे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, गजानन थरकुडे, उल्हास काळोखे, जयदेवराव गायकवाड, उल्हास पवार, मोहन जोशी, रमेश बागवे, कमल व्यवहारे, दीप्ती चौधरी, माजी उपमहापौर दीपक मानकर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, शिक्षक आणि पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जास्त जागा आल्या आहेत. हा सरकारचा पराभव आणि अपयश आहे. रडीचा डाव, फोडाफोडी आणि गद्दारी करून ते सत्तेवर आले आहेत. अशी अस्थिरता राज्याला आणि विकासाला परवडणारी नाही. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवरही होत आहे. माझ्या कामाची कोणी दखल घेईल का, महापालिका निवडणुकीत मला उमेदवारी मिळेल का याचा विचार आता करू नका. कृपा करून कार्यकर्त्यांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नका.
नाना पटोले म्हणाले, ‘कसबा विधानसभा मतदार संघाच्या सातबारा उताऱ्यावर भाजपचे नाव लिहिले नाही, हे दाखवून द्या. सत्तेची घमेंड असलेल्यांना दणका देण्याची वेळ या निमित्ताने आली आहे.’
फटाके वाजविणारे लय आले आणि गेले
महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा सुरू असताना अजित पवार यांचे भाषण सुरू होते. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजविले. भाषणात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, ३१ वर्षे राजकारणात आहे. आतापर्यंत असे फटाके वाजविणारे लय आले आणि गेले, अशा शैलीत त्यांनी उत्तर दिले.
हात जोडत दिला नकार
मेळाव्याला सुरुवात झाल्यावर काही कार्यकर्ते व्यासपीठावर काळे फुगे आणि त्यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो घेऊन आले होते. ते फुगे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते हवेत सोडून निषेध नोंदविला जाणार होता. ते फुगे सोडले जावेत, अशी विनंती कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना केली. त्याला अजित पवार यांनी हात जोडत नकार दिला.