पुणे : अयोध्येतील विवादीत भूखंडावर मानवता भवन उभारले जावे. या मानवता भवनामध्ये २५ ते ३० एकर जागेवर एक भव्य श्रीराम मंदिर उभारावे आणि उरलेल्या भूखंडापैकी प्रत्येकी ५ एकर जागेवर भारतातील इतर मुख्य धर्म मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, झोराष्टÑीयन, ज्यू यांची प्रार्थनास्थळे उभारावीत, असे आवाहन माजी कुलगुरूंच्या संघटनेकडून करण्यात आले आहे.अयोध्येतील रामजन्मीभूमी व बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. याबाबतच्या निवेदनावर माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, डॉ. सुभाष आवले, डॉ. अरुण जामकर, डॉ. राजू मानकर, डॉ. एस. टी. देशमुख, डॉ. अरुण सावंत, डॉ. शरद निंबाळकर, डॉ. एन. एन. मालदार यांनी सह्या केल्या आहेत. अयोध्याप्रश्नाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने काही आजी-माजी कुलगुरू, शिक्षक यांनी प्रत्यक्ष अयोध्येला भेट देऊन परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आम्हाला असे आढळले की, विवादीत २.७७ एकर भूखंड व त्याच्याशी संलग्न असलेला सुमारे ६७.७ एकर भूखंड केंद्र शासनाने अधिग्रहित केला आहे. या जागेवर सर्वधर्मीयांचे मानवता मंदिर उभारणे उचित ठरेल.केंद्र शासनाने ६७.७ एकर भूखंडाचा ताबा श्रीरामजन्मभूमी न्यासाकडे देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. परंतु, आपल्या देशाचे बहुधार्मिक-बहुपंथक मानवतावादी स्वरूप बघता केवळ एकाच धर्माच्या प्रार्थनास्थळासाठी भूखंड उपलब्ध करून देणे अयोग्य ठरेल, असे आम्हाला वाटते. त्याऐवजी त्या जागेचा वापर श्रीराम मंदिरासहित सर्व प्रमुख धर्मांची प्रार्थनास्थळं उभारण्यासाठी केल्यास ते आपल्या देशासाठी अधिक सयुक्तिक ठरेल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी कुलगुरूंच्या फोरम आॅफ फॉर्मर चॅन्सलर संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
'अयोध्येच्या वादग्रस्त जागेवर मानवता भवन उभारा'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 3:28 AM