पुणे : मानवी आयुष्य ही खूप सुंदर आहे. ड्रग्जच्या विळख्यात अडकून दुष्टचक्रात अडकण्यापेक्षा चांगल्या सवयींच्या चक्रात अडका. नशेच्या आहारी जाण्यामुळे ती नशा सातत्याने मिळण्यासाठी तुम्ही चुकीचे पाऊल उचलता आणि गुन्हेगारीचा मार्ग निवडता. सर्व नियम डावलून तुम्ही केवळ नशा या एकमेव मुद्याभोवती घुटमळत बसता. त्यापेक्षा कर्तव्यपूर्तीसाठी जीवन सार्थकी लावा, असा सल्ला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तरुणांना दिला.
जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त दरवर्षी ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती’ केंद्रातर्फे जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून कृष्ण प्रकाश यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. तसेच आयुक्तांनीदेखील पुणतांबेकर यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली.
कृष्ण प्रकाश म्हणाले, जीवनामध्ये कधी किक पाहिजे असते, तर कधी शांती पाहिजे असते. त्यासाठी व्यसनांचा आधार घेण्यापेक्षा सायकलिंग, स्विमिंग, फुटबॉल आदी क्रीडा प्रकारांचा आधार घेतल्यास त्यातून मिळणारा आनंद क्रित्येक पटीने श्रेष्ठ आहे. केवळ स्वत:च्या क्षणिक आनंदासाठी जगू नका.
डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ‘करा आरोग्याचा विचार, द्या व्यसनाला नकार’, असे घोषवाक्य या वर्षीसाठी निश्चित करण्यात आले आहे. वाईट व्यसनापासून दूर राहायचे असेल तर व्यायामासारखे चांगले व्यसन लावून घेणे महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या.
------------------------------------------