नारायणगाव : ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करा, राजधर्माचे पालन करा, एक रुपयाचा देखील गैरकारभार करू नका, भ्रष्टाचाराचा कलंक लागल्यास गावपातळीवर आणि पुढील पाच पिढ्यांची मानहानी होईल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
वारूळवाडी ग्रामपंचायतीने सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या आणि पुणे जिल्ह्यातील अद्ययावत अशा ग्रामसंसद या इमारतीची पाहणी करून आयुष प्रसाद यांनी समाधान व्यक्त केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, दिलीप गांजाळे, नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, संजय वारुळे, आशिष फुलसुंदर, विपुल फुलसुंदर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य जंगल कोल्हे, आत्माराम संते, देवेंद्र बनकर, ज्योती संते, सतेज भुजबळ आदी उपस्थित होते.
आयुष प्रसाद यांनी नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे यांचा सत्कार करून सत्ताधा-यांना पारदर्शक कारभार करण्याचा सल्ला देऊन विरोधी गटातील सदस्यांना विश्वासात घेऊन राजधर्माचे पालन करावे, अशी सूचना केली. पुढील पाच वर्षांत आदर्श अशी ग्रामपंचायत करून नागरिकांना मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून द्यावे, परिसर विकासासाठी औद्योगिक धोरणाचा अवलंब करावा असाही सल्ला प्रसाद यांनी मार्गदर्शन करताना दिला.
२३ नारायणगाव
राजेंद्र मेहेर यांचा सत्कार करताना आयुष प्रसाद.