महाराष्ट्रात मराठी विषयाला कोणताही पर्यायी विषय असू नये, असे असताना इतर भाषा व आयटीसारखा विषय सर्रास पर्याय म्हणून ठेवला जात आहे. आयटीविषय विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेला असल्याने या विषयासाठी विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क आकारले जाते. त्यातून अल्पमानधनावर संबंधित विषय शिक्षकांची नियुक्ती केली जाते. तसेच, विद्यार्थ्यांना गुणांचे आमिष दाखवले जाते. परंतु, केवळ विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी करून आर्थिक उत्पन्नवाढीसाठी म्हणून शैक्षणिक संस्था या विषयाकडे पाहत आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
इयत्ता अकरावी-बारावीतील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या बरोबरीने कोणतीही एक भारतीय भाषा किंवा मातृभाषा म्हणून मराठी भाषा शिकवणे सक्तीची होणे आवश्यक आहे. इंग्रजी व पर्यावरण हे दोन विषय सोडले तर इतर कोणताही विषय सक्तीचा नाही. इतर विषयांपैकी कोणतेही पाच विषय निवडून परीक्षा देता येते. परंतु, शासनाचे कोणतेही आदेश नसताना आयटी विषय हा भाषा विषयाला पर्याय म्हणून ठेवला जात आहे. विद्यार्थी संख्येअभावी महाविद्यालयांमधील भाषा विषयाचे शिक्षक अतिरिक्त ठरत असून या समस्या अधिकाधिक गंभीर होत चालल्या आहेत.
--------------------------
येत्या शैक्षिणक वर्षात सक्तीचे करा
विद्यार्थ्यांनी भाषा आणि साहित्यांचे अध्ययन केलेच नाही तर भाषेतून व्यक्त होणारी साहित्य परंपरा, थोर महापुरुषांचे कार्यकर्तृत्व, नामांकित साहित्यिकांचा परिचय ,भारतीय संस्कृती, नीतिमूल्ये यांची ओळख कशी होणार? भाषेमुळे त्यांचे विचार प्रगल्भ होतात. सुसंस्कृत नागरिक घडण्यासाठी भाषा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषय सक्तीचा करावा. विद्यार्थी मराठी भाषेपासून दूर जाऊ नयेत. या शुद्ध हेतूने ही मागणी करण्यात आली असल्याचे मराठी विषय शिक्षक महासंघातर्फे कळविण्यात आले आहे.