लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : करा फोन घ्या माहिती या केंद्र सरकारच्या किसान कॉल सेंटरला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेती संबधित विविध माहितीसाठी रोजचे २ हजार तर हंगामात ५ हजारपेक्षा जास्त फोन सेंटरला दररोज येत असतात.
केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाची ही योजना आहे. राज्यातील त्याचे प्रमुख केंद्र पुण्यात आहे. योजना १० वर्षांपूर्वी सुरू झाली. सुरूवातीला प्रतिसाद नव्हता. मात्र, आता राज्याच्या विविध भागांमधून दररोज शेतकऱ्यांचे शेकडो फोन येतात. खते कोणती वापरावीत पासून ते पावसाचा अंदाज काय व कोणते पीक घेतले तर चांगली बाजारपेठ मिळेल, अशी असंख्य प्रकारची माहिती या फोन कॉलवरून विचारली जाते. तसेच सेंटरमधून ती व्यवस्थित दिली जाते.
त्यासाठी नऱ्हे येथील कॉल सेंटरमध्ये ६० ऑपरेटर, ६ व्यवस्थापक व ५ पर्यवेक्षक आहेत. टोल फ्री नंबर आहे. सर्वाधिक फोन विदर्भ, मराठवाडा या भागातून येतात. बहुसंख्य शेतकरी तरूण मुले असतात. त्यांंना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती हवी असते. खरीप हंगामात फोन जास्त असतात. नैसर्गिक आपत्तीत काही नुकसान झाले तरीही फोन येतात. फोन घेऊन माहिती देणारे सर्व ऑपरेटर कृषी पदवीधर आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यात येते, फोन कॉल विनामूल्य असल्याने शेतकर्याला कसलाही खर्च येत नाही.
किसान कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक - १८००१८०१५५१
कोट
फोन कॉल घेणाऱ्यांचे शेतीविषयक ज्ञान अद्ययावत ठेवले जाते. त्यांंना नवी माहिती सातत्याने पुरवली जाते. त्यासाठी त्यांंना काही शेतीतज्ञ जोडून दिले आहेत. सल्ला मागितला त्याचा फायदा झाल्याचे सांगणारे फोन कॉलही येत असतात.
- धनंजय पोतेवार, व्यवस्थापक, किसान कॉल सेंटर
---
मागील काही वर्षात किसान कॉल सेंटरचा प्रतिसाद लक्षणीय वाढला आहे. राज्य सरकारच्या कृषी विषयक विविध योजनांची माहितीही आता या कॉल सेंटरमधून दिली जाते.
- प्रिती हिरुळकर, राज्य समनवयक, किसान कॉल सेंटर