पुणे : डेक्कन जिमखाना, केळकर रस्ता, जंगली महाराज रस्ता येथे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी संभाजी पूल दुचाकींसाठी खुला करण्यात यावा, असा ठराव शहर सुधारणा समितीने गुरुवारी मंजूर केला. संभाजी पुलावर नो एंट्रीतून आला म्हणून दुचाकीचालकांना अडवून होणाऱ्या दंडवसुलीला यामुळे लगाम बसणार आहे.संभाजी पुलावर दुचाकी वाहनांना कधी बंदी घालण्यात आली, त्याबाबतच्या आदेशाची प्रत मिळावी, अशी माहिती अजहर खान यांनी वाहतूक विभागाकडे मागितली होती. त्या वेळी वाहतूक विभागाकडे अशी बंदी घातल्याची प्रत आढळून न आल्याने वाहतूक विभागाने अशी बंदी घातलेलीच नाही, असे उत्तर त्यांना देण्यात आले होते. मात्र, चूक लक्षात आल्यानंतर वाहतूक विभागाने तातडीने खुलासा करून संभाजी पुलावर दुचाकीना बंदी घालण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले होते. नगरसेविका पुष्पा कनोजिया यांनी शहर सुधारणा समितीकडे संभाजी पूल दुचाकींसाठी खुला करण्यात यावा, असा ठराव दिला होता. या ठरावास गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आल्याची माहिती समितीच्या अध्यक्ष रूपाली पाटील-ठोंबरे यांनी दिली. झेड ब्रिज तयार झाल्यानंतर दुचाकींनी झेड ब्रिजवरून जावे व केवळ चारचाकी वाहनांसाठी संभाजी पूल वापरण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, संभाजी पुलावरून चारचाकी वाहनांची इतकी वर्दळ असत नाही. त्यामुळे तो दुचाकींसाठीही खुला करण्यात यावा, असा निर्णय शहर सुधारणा समितीने घेतला आहे. शहर सुधारणा समितीच्या मंजुरीनंतर मुख्य सभेकडे हा विषय मान्यतेसाठी ठेवला जाईल. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर या ठरावाची अंमलबजावणी करण्याची सूचना महापालिकेकडून केली जाईल.
संभाजी पूल दुचाकींसाठी खुले करा
By admin | Published: October 16, 2015 1:25 AM