सासवड : मागील वर्षात पाणी फाउंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जल संधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. यामुळे अनेक गावे जल समृद्ध झाली आहेत. गावच्या पाणी पातळीत वाढ झाली, परंतु, या पुढील काळात पाण्याचा काळजीपूर्वक योग्य वापर केला पाहिजे, यासाठी आगामी समृद्ध गाव योजनेच्या माध्यमातून विकासकामांचे मायक्रो प्लॅनिंग करावे आणि लोक सहभाग घेऊन योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामांच्या आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सासवड पंचायत समितीमध्ये बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोईनकर, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, विभागीय अधिकारी आबासो लाड, तालुका समन्वयक मयूर साळुंखे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, पंचायत समिती सभापती नलिनी लोळे, सदस्य रमेश जाधव, सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, तालुका कृषी अधिकारी अंकुश बरडे, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता ए. एस. दिलपाक, वनपरीक्षेत्र अधिकारी जयश्री जगताप, त्याच प्रमाणे विविध विभागांचे विस्तार अधिकारी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, आगामी स्पर्धेतील १४ गावांचा आराखडा तयार करून कामांची आखणी करावी. प्रत्येक गावाला एक नोडल अधिकारी नियुक्त करून सर्वांमध्ये समन्वय ठेवावा. दर आठवड्याला आढावा बैठक घेवून तो आढावा प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे द्यावा. अधिकाऱ्यांनी गाव भेटी करून गावकऱ्यांनी सुचविलेली कामे प्राधान्याने करावीत. कोणत्याही निधीची कमतरता जाणवू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले की, ७६ तालुक्यांपर्यंत ही योजना पोहोचली असून आता ३९ तालुक्यातील ९५६ गावांत ही स्पर्धा राहणार आहे. या स्पर्धेचा कालावधी दोन वर्षांचा असून यामध्ये ग्रामसभा घेवून जलसंधारणाबरोबरच पिकांचे नियोजन, गवत लावणे, फळबागा लागवड, वृक्ष लागवड, भूजलाचा अभ्यास करणे, गावचे सर्वेक्षण करून गावातील जैवविविधता, पक्षी, प्राणी, पशु यांची माहिती, राहणीमान यांचा अभ्यास केला जाणार आहे.
शेत तळ्याच्या कडेला वृक्ष लागवड केली जाणार आहे. शेती गट स्थापन करणे, विविध फळे, पालेभाज्या यांचे उत्पादन केले जाणार आहे.
तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले कि, स्पर्धेतील १४ गावांमध्ये १३ कोटी रुपयांची २४८० कामे नियोजित केली आहेत. गाव पातळीवर भेटी देवून सर्व योजना त्यांच्यापर्यंत नेण्यात येतील, कामांचे वेळापत्रक तयार करून प्राधान्याने कामे करण्यात येईल.
०६ सासवड
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख.