पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अहमदनगरमध्ये ऑनर किलिंगच्या अनेक घटना समाेर आल्या असून राज्यात सातत्याने असे प्रकार घडत असल्याने या विराेधात विशेष कायदा करण्याची मागणी पुण्यातील मानवधिकार कार्यकर्ते अॅड. विकास शिंदे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य महिला आयाेग तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयाेग यांना निवेदन दिले आहे. तसेच अहमदनगर येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनांचे खटले जलदगती न्यायालयात चालवावे अशी मागणी देखील केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये ऑनर किलिंगच्या घटना समाेर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर शिंदे यांनी निवेदन दिले आहे. 28 मार्च राेजी अहमदनगर येथील जामखेड तालुक्यामध्ये प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन 11 वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीची तिच्या वडीलांनी आणि मामाने मिळून निर्दयीपणे हत्या केली हाेती. तसेच हत्या करुन घराजवळच असलेल्या शेत तळ्याच्या बाजुला राॅकेल टाकून तिचा मृतदेह जाळला हाेता. या घटनेनंंतरच पंधराच दिवसात नेवासा तालुक्यातील काैठा या गावामध्ये मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे पीडीत मुलीच्या पालकांनी तिला लग्न लावून देताे म्हणून बाेलावून तिचा खून केला.
एका महिन्यात दाेन ऑनर किलींग झालेले असताना हे थांबविण्यासाठी सरकारकडून काेणतीही प्रतिक्रिया आली नसल्याने शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 2004 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेमध्ये सन्मानाच्या नावाखाली महिलांविरुद्ध हाेणारे गुन्हे राेखण्यासाठी एक ठराव पास करण्यात आला व त्या ठरावानुसार प्रत्येक सदस्य राष्ट्राने अशा प्रकारचे गुन्हे राेखण्यासाठी विशेष कायदे करावेत, प्रशासकीय पातळीवर कृती आराखडे तयार करण्याबाबत ठरविण्यात आले आहे. आपल्या सरकारला आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचा विसर पडला असल्याचे शिंदे यांनी निवदेनात नमूद केले आहे.
शिंदे म्हणाले, ऑनर किलींग राेखण्यासाठी सरकारने पाॅस्काे सारखा विशेष कायदा करण्याची आवश्यकता आहे. अनेकदा ऑनर किलींगच्या घटना घडू शकते याची माहिती गावातील ग्रापपंचायत सदस्य, सरपंच यांना माहित असते. परंतु अनेकदा याबाबत पाेलिसांना माहिती दिली जात नाही. त्यामुळे ऑनर किलींगसाठी विशेष कायदा करुन त्यात अशा घटना राेखण्याची जबाबदारी सरपंच, ग्रापपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांना नेमून द्यायला हवी. तसेच प्रत्येक पाेलीस स्टेशनमध्ये समुपदेशन कक्ष उभारण्यात यावा. जिथे मुला -मुलींचे तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे. अनेकदा प्रेमविवाहामध्ये गावामध्ये इज्जत जाईल या भावनेतून ऑनर किलींगच्या घटना घडतात. परंतु जर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच जर या विराेधात पुढे आल्या तर अशा घटना घडणार नाहीत. त्यामुळे असा कायदा करणे आवश्यक आहे. त्याचबराेबर एक हेल्पलाईन सुरु करणे सुद्धा आवश्यक आहे.