पुणे : विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्त प्रशालेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य देण्यास विलंब केला जातो. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी एक महिना आगोदर अभ्यास साहित्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांचा अभ्यास करण्यास अडचणी येतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नोट्स उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी अधिसभेच्या बैठकीत करण्यात आली.
विद्यापीठाचे अधिसभा सदस्य शशिकांत तिकोटे यांनी दूरस्त विद्यार्थ्यांच्या अभ्यास साहित्याच्या प्रश्नाकडे विद्यापीठाचे लक्ष वेधले. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी सभागृहात मांडला. मात्र, कोरोनामुळे आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी संख्या माहिती नसल्याने अभ्यास सहित्य उपलब्ध करून देणे शक्य झाले नाही, अशी माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली. परंतु, या पुढील काळात अभ्यास साहित्य परीक्षेपूर्वी काही महिने आधी दिले जाईल, असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
बागेश्री मंठाळकर यांनी कोरोनानंतर विद्यापीठाच्या वसतिगृहांची व रिफेक्ट्रीची दुरवस्था झाली असून विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ स्वच्छतेची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली. त्यानुसार विद्यापीठाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
---------------------------