तळेगाव ढमढेरे : येथील ग्रामपंचायतीला दोन उपसरपंच करण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे सरपंच अंकिता भुजबळ व उपसरपंच राहुल भुजबळ यांनी केली आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत) मध्ये सुद्धा दोन उपसरपंच करण्याची तरतूद करण्यात यावी. यासाठी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीचे सरपंच अंकिता भुजबळ व उपसरपंच राहुल भुजबळ यांनी जिल्हाधिकारी पुणे व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बहुतांश ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे आरक्षित असल्याने काम करण्याची इच्छा असूनही आरक्षित जागेमुळे संधी हुलकावणी देऊन जाते.
सध्याची परिस्थिती पाहता वाढत्या शहरीकरणामुळे गावची वाढती लोकसंख्या, ग्रामस्थांच्या विविध अडीअडचणी, सोडविण्यासाठी व तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. त्याच अनुषंंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दोन उपसरपंच करण्यासाठी तरतूद करण्यात यावी, तसेच आमच्या मागणीचा सकारात्मक अभिप्राय आम्हाला कळवावा, अशी मागणी या दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायत सतरा सदस्यांची असून यापैकी नवनाथ ढमढेरे, मच्छिंद्र भुजबळ, यांना उपसरपंच पदे मिळालेली आहेत, तर सध्या राहुल भुजबळ हे उपसरपंच आहेत. ग्रामपंचायतने केलेल्या मागणीनुसार प्रशासनाने परवानगी दिल्यास पाच वर्षांच्या कालावधीत इतर सदस्यांना उपसरपंच पद मिळू शकेल.
''गावतही अनेक गटतट असतात. त्यापैकी अनेक सदस्य सरपंच पद आपल्याला मिळावे यासाठी इच्छुक असतात; परंतु आरक्षणामुळे सरपंच पदाची संधी इतर सदस्यांना मिळत नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याला कारभार चालविण्यासाठी दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत (ग्रामपंचायत) गावगाडा चालविण्यासाठी दोन उपसरपंच असावेत, अशी तरतूद करण्यात यावी. -अनिल भुजबळ, सदस्य, ग्रामपंचायत, मा. उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर''