पुणे : कलाकारांच्या तोंडाला रंग लावून त्यांना सज्ज करण्याचा वसा ४५ वर्षे निष्ठेने सांभाळणारे.. सुरांची जाण असतानाही केवळ हौसेखातर ऑर्गन वादन करीत रंगभूषेला प्राधान्य देणारे.. कलाप्रवासातील अनुभवांवर रंगभूषा हे पुस्तक लिहिणारे.. ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे निधन झाले. ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ते ब्रेनट्यूमर आजाराने ग्रस्त होते आणि त्यानंतर त्यांचे एकएक अवयव निकामी होत गेले. शुक्रवार पेठ येथे मुलीच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तोंडाला रंग चोपडून रंगमंचावर उभे राहिले की भूमिका ठसत नाही. त्या रंगांमागे संपूर्ण नाटकाचा, भूमिकेचा विचार असावा लागतो; तरच भूमिका ठसते.’ प्रभाकर नीलकंठ भावे ऊर्फ भावेकाका गेल्या ५२ वर्षांपासून ही उक्ती कृतीत आणून भूमिकांना अर्थ प्राप्त करून देत आहेत. नाटकामध्ये रंगभूषेला स्वतंत्र अस्तित्त्व मिळवून देण्यात भावेकाकांची भूमिका मोलाची आहे. ते रंगभूषाकार नाही, तर रंगभाषाकार ठरले आहेत.
साताऱ्यात ‘एलआयसी’मध्ये नोकरी करणाऱ्या भावेकांकांच्या वडिलांना नाटकाची आवड होती. पडदे रंगविण्यापासून मूर्ती करण्यापर्यंत विविध कला त्यांना अवगत होत्या. भावेकाकांचे आजोबाही साताऱ्याच्या नाट्यसंस्थेत स्त्री पार्टी करायचे. एकदा आजोबांनी त्यांच्या वडिलांना रंगभूषा शिकण्याविषयी सुचविले. त्यानुसार त्यांनी रंगभूषा शिकून घेतली. तेव्हा पाचवी-सहावीत असलेल्या भावेकाकांना रंगभूषेविषयी उत्सुकता वाटू लागली होती. कुतूहलाने त्यांनी ते रंग पाहिले आणि तेव्हाच त्यांचे या कलेवर प्रेम जडले. त्या सुमारास साताऱ्याला झालेल्या साहित्य संमेलनात त्यांनी ‘सवाई माधवरावाचा मृत्यू’ आणि ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ ही दोन नाटके पाहिली. मास्टर दत्ताराम यांनी रंगवलेले शिवाजीमहाराज आणि नाटकातील रंगभूषेने भारावलेल्या भावेकाकांनी रंगभूषा हेच आपले कार्यक्षेत्र ठरवले. १९६८च्या सुमाराला नोकरीसाठी त्यांनी पुणे गाठले. त्यावेळी पुण्यात नाट्यविश्वात कार्यरत असलेले राजाभाऊ नातू आणि भालबा केळकर यांच्याशी त्यांची गाठ पडली आणि पुण्याच्या नाट्यविश्वाला हक्काचा रंगभूषाकार मिळाला.
‘प्रभात’मधील दादा परांजपे आणि नाना जोगळेकर यांच्याकडे रंगभूषेचे प्राथमिक धडे गिरवल्यावर भावेकाकांनी स्वतःची वेगळी वाट स्वतः घडवली. केवळ रंगभूषाच नाही, तर विविध मुखवटे, विगही ते तयार करतात. त्यांनी केलेल्या मुखवट्यांची आतापर्यंत सुमारे १६ प्रदर्शने देशभरात झाली. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’ या चित्रपटातील मुखवटे भावेकाकांनीच तयार केले होते. वसंत शिंदे, डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यापासून ते आताच्या सिद्धार्थ चांदेकरपर्यंतच्या अभिनेत्यांच्या पिढ्या भावेकाकांच्या रंगभूषेतून घडल्या आहेत. ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘प्रेमाला उपमा नाही’, ‘घाशीराम कोतवाल’ यांसह सुमारे दीड हजार नाटकांची रंगभूषा त्यांनी केली आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धा सुरू होताना संपूर्ण स्पर्धेच्या रंगभूषेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. फिरोदिया करंडक स्पर्धेसाठीही ३५ वर्षे त्यांनी काम पाहिले व स्पर्धांदरम्यान विद्यार्थ्यांशी हितगुज करताना रंगभूषेविषयीचा विचार व्यापक केला. विश्वकोषासाठी रंगभूषा हा विभाग तसेच रंगभूषेमागील विचार स्पष्ट करणारे रंगभूषा हे पुस्तक त्यांनी लिहिले.