पुणे : गणरायाच्या मूर्तीचा जिवंतपणा डोळ्यांत पाहिले की दिसतो; पण मूर्तीचे हे डोळे रेखाटण्यासाठी, त्याच्यात जिवंतपणा आणण्यासाठी मूर्तिकाराला दोन-दोन तास बैठक करावी लागते. तरच ते डोळे साकारू शकतात, अशी भावना प्रसिध्द मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांनी व्यक्त केली.
गणरायाचे डोळे साकारण्याची परंपरा लाभलेले रास्ता पेठेतील अभिजित धोंडफळे हे मूर्ती बनवून कीर्तिवंत झाले आहेत. त्यांच्या मूर्ती परदेशातही गेल्या असून, धोंडफळे कुटुंबातील पाचवी पिढी या क्षेत्रात कार्यरत आहे. नरेश धोंडफळे यांनी १९४० मध्ये गणराय साकारण्यास सुरुवात केली. त्यानंतर रवींद्र धोंडफळे, अनिल धोंडफळे आणि आता अभिजित धोंडफळे मूर्तिवंत झाले आहेत. त्यांची मुलगी दीप्ती ही पाचवी पिढी यात कार्यरत आहे.
मूर्तीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे डोळे. मूर्ती प्रसन्न वाटावी म्हणून डोळ्यांवर काम करावे लागते. याविषयी अभिजित धोंडफळे म्हणाले, ‘‘पूर्वी शमीच्या झाडाची मूर्ती तयार केली जात असे. नंतर मोठे झाड मिळणे अवघड बनले. मग प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आल्या; पण त्यामुळे प्रदूषण होत असे, म्हणून पर्यावरणपूरक मूर्तीची चळवळ सुरू केली. तो वारसा मी चालवत आहे. आता अनेक मूर्तीला कृत्रिम डोळे बसवतात. पण त्याने मूर्तीत भाव येत नाही. त्यासाठी आम्ही पेंटिंग करतो.
गणरायाची मूर्ती साकारणे ही सेवा
मूर्तीवर एकदा रंगकाम केले की, चार वर्षे त्याला पाहायची गरज पडत नाही. तसे काम मी करतो. कारण दरवर्षी नवीन मूर्ती करून त्याने प्रदूषण वाढवायचे नाही. म्हणून मंडळांना मी शक्यतो एकच मूर्ती कायम ठेवा असे सांगतो. केवळ मीटर डाऊन करायचे, पैसे कमवायचे त्यासाठी काम करत नाही. गणरायाची मूर्ती साकारणे ही सेवा आहे आणि ती मी मनोभावे करतो. - अभिजित धोंडफळे, मूर्तिकार
पर्यावरणपूरकतेसाठी चळवळ
पांगूळ आळी मंडळाची मूर्ती १९५५ साली पेपर पल्पपासून तयार केली आहे. ती आजही तशीच आहे. तीच परंपरा मी पुढे चालवतो. पर्यावरणपूरक गणराय बसवावेत, म्हणून मी कार्यशाळाही घेतो. त्यात आवाहन करतो. लोकांच्या मनात ही चळवळ रुजली की, ती आपोआप पुढे जाईल, असेही अभिजित धोंडफळे म्हणाले.
मूर्तीचे वैशिष्ट्य
- एकदा रंग दिला की अनेक वर्षे राहतो- डोळ्यांत जिवंतपणा आणला जातो- कृत्रिम डोळे न बसवता पेंटिंगवर भर- पर्यावरणपूरक मूर्तीसाठी प्राधान्य