पुणे : आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकजण गुणवत्ता मिळविण्याच्या आणि पैसा कमविण्याच्या मागे पळत आहे. परमेश्वराने स्त्रियांना नवी पिढी घडविण्याचे भाग्य दिले आहे. पालकांनी स्वत:चे करिअर घडविण्यामागे आपल्या घरातील मुलांकडे लक्ष देत, तो उत्तम नागरिक घडेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चांगली पिढी घडविणे हे देखील महत्त्वाचे करिअर आहे, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.
श्री ज्ञानेश्वरी वाचन मंदिर (पुणे) आणि मातृगौरव न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णानंद सरस्वती यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अकरा कर्तृत्ववान ज्येष्ठ मातांचा गौरव करण्यात आला. अखिल मंडई मंडळाच्या समाज मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विनायक मोडक, आनंद सराफ, दत्ता सागरे, शिरीष मोहिते, शाहीर हेमंत मावळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे २३ वे वर्ष होते.
कार्यक्रमात शुभदा तौर, विलासिनी भिडे, लक्ष्मी कांबळे, रजनी कुलकर्णी, पुष्पा रासने, लक्ष्मी घाटे, कौसल्या इंगुळकर, शशिकला मेंगडे, रुक्मिणीबाई जाधव, सुजाता साठे, कुसुम कोकाटे, मेधा डोंगरे या मातांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, तुळशीवृंदावन, फुलांची परडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. विनायक घाटे, हरिष मोरे, नृपेश गायकवाड यांचे उपक्रमाला सहकार्य लाभले.
ह.भ.प. चारुदत्त आफळे म्हणाले,आपल्या विचारात बदल घडला तर पुढील पिढीमध्ये देखील चांगले बदल घडतील.
पुरस्काराला उत्तर देताना मेधा डोंगरे म्हणाल्या, व्यवसायवृध्दी सुरू असताना कुटुंब किंवा व्यवसाय निवडण्याची परिस्थिती माझ्यासमोर आली. तेव्हा कुटुंबाला माझी गरज आहे हे ओळखून मी कुटुंबाची जबाबदारी हाती घेतली. स्त्री म्हणून मी सहनशीलतेने काम केलेच, परंतु आज आई म्हणून मिळालेल्या सन्मानाने, कौतुकाच्या चार शब्दांनी मनाला उभारी मिळाली.
विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले. सारंग सराफ यांनी आभार मानले.
-----------------------
* फोटो ओळ : श्री ज्ञानेश्वरी वाचन मंदिर (पुणे) आणि मातृगौरव न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णानंद सरस्वती यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अकरा कर्तृत्ववान ज्येष्ठ मातांचा गौरव करण्यात आला. अखिल मंडई मंडळाच्या समाज मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.