पुणे : शहरात 'टिपी स्कीम' राबविताना सहा मीटर रस्त्यावरील नागरिकांनी आपल्या जागा दिलेल्या आहेत. सहा मीटर अंतर्गत रस्ते हे नागरिकांचे आहेत, ते व्यावसायिक रस्ते नाहीत. त्यामुळे रस्ते नऊ मीटर करणे म्हणजे नागरिकांच्या घरात घुसण्याचा प्रकार असल्याचे मत नगररचना विषयातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत. रस्ते रुंदीकरण करायचे असल्यास अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा कोणालाही फायदा होणार नाही असेही त्यांचे म्हणणे आहे. शहरातील सहा मिटरचे सर्व रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रशासनाच्या प्रस्तावाला उपसूचना देत स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावाला सर्वच विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे. हा प्रस्ताव ठराविक बांधकाम व्यवसायिकांना डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपनेही याविषयी अद्याप फार स्पष्टपणे माहिती दिलेली नाही. त्यामुळे सर्वकाही 'टीडीआर'साठी अशी टीका होऊ लागली आहे. त्यातच आता नगररचना विषयातील तज्ञ हा प्रस्ताव अभ्यास करून मांडायला हवा होता, घाई केल्याने फायदा होणार नाही अशी भूमिका मांडत आहेत. यासंदर्भात अनिता बेनिंजर गोखले म्हणाल्या, शहराचा विकास आराखडा तयार करताना हे रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा डीपी अमान्य करण्यात आला होता. त्यामुळे रुंदीकरणाचा निर्णय मागे घ्यावा लागला होता. शहरात ज्यावेळी टावून प्लॅनिंग स्कीम झाल्या त्यावेळी अनेकांनी आपल्या जागा सहा मीटर (२० फुटी) रस्त्यांसाठी दिलेल्या आहेत. या रस्त्यांवर पार्किंगच्या जागा नाहीत. या रस्त्यांना प्रशासनाने हात लावूच नये अशी भूमिका गोखले यांनी मांडली आहे. सध्या बाजारात मंदी आहे. त्यामुळे बांधकामे कितपत होतील आणि त्याला प्रतिसाद कसा मिळेल हा प्रश्नच आहे. रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबात त्याची सक्षम कारणे देणे आवश्यक आहे. हे रस्ते कुठून कुठे जाणार? याचीही माहिती देणे आवश्यक आहे. स्थायी समितीने हा प्रस्ताव अभ्यासपूर्वक मांडणे आवश्यक होते. या रुंदीकरणामधून कोणालाही फायदा मिळणार नसल्याचे गोखले म्हणाल्या.
पुणे शहरातील रस्ते नऊ मीटर करणे म्हणजे लोकांच्या घरात घुसणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 11:21 AM
रस्ते रुंदीकरण करायचे असल्यास अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा कोणालाही फायदा होणार नाही
ठळक मुद्देअभ्यासकांचे मत : टिपी स्कीमसाठी लोकांनी आधीच जागा दिलेल्या आहेत शहरातील सहा मिटरचे सर्व रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय