--
दौंड : मळद (ता. दौंड) येथील सामूहिक शेती निश्चितच राज्याला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे कृषिप्रधान सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केला.
मळद येथील १३० एकरांतील डाळिंबाच्या सामूहिक शेतीची पाहणी एकनाथ डवले यांनी शनिवार केली, त्या वेळी ते बोलत होते. डवले म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत शेती-व्यवसाय अडचणीत आहे अशा परिस्थितीत सामूहिक शेती काळाची गरज आहे. परिणामी, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दौंड तालुक्यातील मळद येथे डाळिंबाचा १३० एकर क्षेत्रांवर सामूहिक शेतीचा राबवत असलेला प्रयोग निश्चीतच वाखाणण्याजोगा आहे. सामूहिक शेतीचा प्रयोग इतर शेतकऱ्यांनी करून आपली प्रगती साधावी कृषिभूषण अंकुश पडवळे, तसेच त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत दौंड तालुक्यातील मळद येथे सामूहिक शेती विकसित केली आहे. तसेच या शेतीला जैविकतेची जोड असल्याने हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरेल.
याप्रसंगी डवले यांनी १३० एकरांवरील डाळिंब शेतीसह, जिवाणू स्लरी युनिट, सेंद्रिय मल्चिंग, प्रोटेक्शन नेटचा वापर, शेततळे, पंप हाऊस आणि पर्जन्यमापक यंत्राची प्रत्यक्षात पाहणी करून माहिती घेतली. याप्रसंगी कृषी गुणनियंत्रक अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर गोटे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, मंडल कृषी अधिकारी कदम यांच्यासह कृषिभूषण अंकुश पडवळे, अमरजित जगताप, बापू गडदे, गणेश पारेकर, तानाजी घाटगे, अरुण आटोळे, नीलकंठ जाधव, दीपक गायकवाड, ज्ञानेश्वर औताडे, दीपक गावंडे यांच्यासह,शेतकरी उपस्थित होते.
-
साडेचारशे एकरांवरचा मानस
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी व्यावसायिक होणे गरजेचे आहे. व्यावसायिकतेचा फायदा शेतीला होईल. तेव्हा हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून आम्ही प्रतिकूल परिस्थितीत नवीन पध्दतीने ‘काॅन्ट्रॅक्ट फार्मिंगचा’ प्रयोग यशस्वी प्रयोग करीत आहोत. हा प्रयोग जैविक शेतीवर आधारित आसल्याने या विश्वासावरच साडेचारशे एकरांवर सामूहिक शेती करण्याचा मानस आहे.
-अंकुश पडवळे,
कृषिभूषण, शेतकरी
--
फोटो क्रमांक : १३ दौंड मळद सामूहिक शेती
फोटो ओळी : मळद ( ता. दौंड ) येथे जिवाणूस्लरी विभागाची पाहणी करताना कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले.