कान्हूर मेसाई : दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने झालेल्या मृत्यूच्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच, आज मलठण येथे ३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूने मलठण पुन्हा हादरले. लोकांची बेपर्वाई, निष्काळजीपणा आणि प्रशासन करीत असलेल्या सूचनांकडे पूर्ण दुर्लक्ष यामुळे मलठण येथे ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावर उपाय म्हणून संपूर्ण मलठण बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला असून, त्याची कडक अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे. ह्या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्कालीन कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्याचा इशारा सरपंच शशिकला फुलसुंदर, पोलीस पाटील अर्चना थोरात, मंडल अधिकारी प्रशांत शेटे, ग्रामविकास अधिकारी विलास शिंदे यांनी दिला आहे. तशा आशयाचे पत्र ताडतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य अनिल शिंदे व ग्रामपंचायत सदस्या राणीताई मुकुंद नरवडे यांनी सांगितले की, गुरुवारच्या रात्री पेन्शनर संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते भानुदास साळवे, लाखेवाडी येथील रंगनाथ कुंडलिक सकपाळ व सुनंदा मारुती कोठावळे या तिघांचाही कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत मलठण गावामध्ये कोरोनाने १३ जणांचा बळी गेला आहे. मात्र, एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू झाल्याने गंभीर परिस्थितीची जाणीव होत आहे. सामाजिक कार्यकर्ते मुकुंद नरवडे यांनी सांगितले की, काही कोरोनाबधित रुग्ण राजरोसपणे गावात फिरताना दिसतात. गंभीर परिस्थितीची जाणीव देऊनही ते डोळेझाक करतात. लाखेवाडी ह्या छोटयाशा वाडीत अनेक कोरोनाबाधित असूनही आजार अंगावर काढणे, वेळेत डॉक्टरी उपचार न घेणे व विलगीकरणात न रहाणे असे प्रकार होताना दिसतात. त्याची परिणती म्हणून आज २ रुग्ण दगावले. एकंदरीत, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन करीत आहे.
आजपासून गावातील सर्व व्यवहार दि. १७ मेपर्यंत पूर्ण बंद राहतील, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.