शिरूर : निमोणे (ता. शिरूर) येथील रंगनाथ गायकवाड यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कारही करण्यात आले. कुुटुंबप्रमुख गेला असतानाही, गायकवाड यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आज जि. प. व पं. स. या निवडणुकीसाठी मतदान करून, आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. हा सर्वच नागरिकांसमोर एक आदर्शच म्हणावा लागेल. कारण, आजही अनेक मतदार हे मतदानापासून अलिप्त राहताना दिसतात.रंगनाथ गायकवाड हे कुटुंबाचे प्रमुख होते. गावात मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना गायकवाड यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती. साडेनऊला गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर गायकवाड यांच्या कुटुंबातील सदस्यही घरी परतले. दु:खाच्या या प्रसंगामुळे हे सदस्य मतदानाला येणार नाहीत, असे सर्वांना वाटले असावे. मात्र, या सुशिक्षित कुटुंबातील सदस्यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गायकवाड यांची पत्नी, ज्येष्ठ बंधू, भावजय, मुले आणि कुटुंबातील सर्वच सदस्यांनी एकत्र येऊन मतदानाचा हक्क बजावला या निमित्ताने त्यांनी मतदानापासून अलिप्त राहणाऱ्यांना जणू काही एक संदेशच दिला. रंगनाथ गायकवाड हे प्रा. बाळासाहेब गायकवाड यांचे चुलते होत.
कर्ता पुरुष गेला, तरीही केले मतदान
By admin | Published: February 22, 2017 2:25 AM