माळेगाव : ऐतिहासिक वारसा संपन्न व सुसंस्कृत असलेल्या माळेगावाला राजकीय गुन्हेगारीने बदनाम केले आहे. गटातटातील वर्चस्वातून गेल्या तीन-साडेतीन वर्षांत गाव अशांत झाले आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादीचे रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खरे तर राजकीय दृष्टिकोनातून माळेगाव हे सातत्याने राजकीय पटलावर चर्चेत असणारे हे गाव आहे. खासदार शरद पवार यांची यशस्वी राजकीय कारकीर्द याच गावातील धुरंधरांनी घडवली आहे. पवार यांचे निवासस्थान याच गावात आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे व विशेषत: उपमुख्यमंत्री पवार यांचा शब्द मानणारे गाव अशी ओळख आहे. पूर्वी गावात राजकीय गटतट होते. त्यांच्यात वादविवाद होत होता. अपवादाने मारामारीदेखील झाली; पण शस्त्राचा वापर कधीच झाला नाही. त्यांचे वाद शब्दांवर मिटायचे व गावात शातंता नांदायची. मात्र, सन २०१७ ला झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून गटातटातील वादाला अधिक जोर आला. दोन गट एकमेकांना पाण्यात पाहू लागले. त्यामुळे गटाचे राजकारणात अधिक व्यापक होऊ लागले. वादविवाद वाढत गेले.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीस वर्ष होताच सोशल मीडियाचा वादासाठी वापर होऊ लागला. एक गट सोशल मीडियावर जाहिरातबाजी करण्यात मग्न होता, तर दुसरा गट त्याविरोधी संदेश प्रसारित करत होता. एखाद्या राजकीय कार्यक्रमात, अथवा ग्रामसभेत खडाजंगी होऊ लागली. गेल्या तीन-चार महिन्यांत गावातील विकासकामांचे उद्घाटन, कोविड सेंटर, वाढदिवसाचे आक्षेपार्ह फ्लेक्स यांवरून मोठा वादंग झाला होता. एका गटाची भांडणे झाली तर दुसरा गट ते भांडण कसे वाढेल याकडे लक्ष देत होता. यामधून वैयक्तिक खुन्नस वाढत गेली. यातून काही समर्थकांना मार खावा लागला होता. हा वाद थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात गेला होता.
—————————————————
...वाद आणखी उफाळणार
आगामी काळात नगरपंचायत निवडणूक होणार आहे. या काळात गटातटातील वाद आणखी उफाळून येणार आहे. नगरपंचायत निवडणुकीसाठी चांगल्या व निष्कलंक उमेदवारांची गरज आहे. गावातील अनेक युवा पदाधिकाऱ्यांनी गावामध्ये वर्चस्व राखण्यासाठी गावगुंडांना हाताशी ठेवलेले पाहायला मिळतेय.