सांगवी : माळेगाव पोलिसांच्या वतीने रविवारी (दि. २०) बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे धडक कारवाई करून एका १३ वर्षीय मुलीचा बालविवाह केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात कारवाई करत समजपत्र देण्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी इम्तियाज राजमहंमद इनामदार यांनी शासनामार्फत फिर्याद दिली आहे.
मुलीचे वडील राजेश अजगर भोसले, आई वारणा राजेश भोसले (दोघेही रा. माळेगाव खुर्द, ता. बारामती) नवरा मुलगा राहुल भानुदास शिंदे, नवरदेवाचे वडील भानुदास मायाजी शिंदे व आई रूपाली भानुदास शिंदे (सर्व रा. पिपरी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई करून मुलीला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक देवीदास साळवे यांनी माहिती दिली.माळेगाव खुर्द येथील ग्रामपंचायत हॉल येथे एक बालविवाह सुरू असल्याची माहिती एका अनोळखी संपर्क क्रमांकावरून माळेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांना देण्यात आली. यानंतर तातडीने पोलिसांनी विवाह झाल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.