पुणे : आंबेगाव तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त माळीण गावाचा विकास करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विकास आराखडा तयार केला जाणार असून या आराखड्यानुसार माळीण गावाला ‘मॉडर्न व्हिलेज’चे रूप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती माळीण गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना अपेक्षित असलेले गाव उभे करून देण्यासाठी मदत करणार आहे, असे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.माळीण दुर्घटनेनंतर या गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी विद्यापीठाने स्वीकारली तसेच विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत देण्याची भूमिकाही विद्यापीठातर्फे घेण्यात आली. त्यानंतर आता माळीण गावाला मॉडर्न व्हिलेज बनविण्यासाठी विद्यापीठातर्फे पाऊल उचण्यात आले आहे. त्याचप्रमाणे माळीण दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजार रुपये विम्याची रक्कम देण्यात आली आहे.डॉ. गाडे म्हणाले, सामाजिकशास्त्र, भूगोल, विज्ञान आदी विषयातील तज्ज्ञ प्राध्यापकांची समिती स्थापन करून या गावाचा विकास केला जाणार आहे. तसेच या गावातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी विद्यापीठातर्फे सहकार्य केले जाईल. विद्यापीठातर्फे तयार केल्या जाणाऱ्या विकास आराखड्याप्रमाणे गावात पायाभूत गोष्टी उभ्या करण्यासाठी विद्यापीठाकडूनच निधी उपलब्ध करून दिला जाईल. (प्रतिनिधी)
माळीण होणार ‘मॉडर्न व्हिलेज’
By admin | Published: October 13, 2014 12:33 AM