लोकमत न्यूज नेटवर्क
घोडेगाव : कोकण, पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळून जीवित आणि वित्तहानी होत असल्याच्या घटना घडत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी वसलेली अनेक गावे पुनर्वसनाची मागणी करत आहेत. तळीये दुर्घटनेनंतर ही मागणी तीव्र झाली आहे. माळीण दुर्घटनेनंतर प्रशासनाने वेगाने निर्णय घेत एक आदर्श गाव वसवले. माळीणच्या धर्तीवरच जिल्ह्यासह कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराच्या तळाला वसलेल्या गावांचे पुनर्वसन झाल्यास भविष्यकाळीत जीवतहानी टळू शकते.
तळीये ग्रामस्थांचे शासनाला माळीणप्रमाणेच पुनर्वसन करावे लागणार आहे. तळीयेचे पुनर्वसन करताना माळीणमध्ये केलेल्या कामाचा निश्चित उपयोग होणार आहे. माळीण पुनर्वसनात ६७ घरे व १८ मूलभूत सेवासुविधा देण्यात आल्या. या नवीन जागेवर पुन्हा माळीणसारखी घटना घडू नये यासाठी जागा सपाटीकरण करणे व संरक्षण भिंती बांधणे हे काम तांत्रिकदृष्ट्या करण्यात आले. घरेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे भूकंपरोधक, कमी खर्चात उपयोगी अशी बांधण्यात आली. तसेच शाळा, जनावरांचा गोठा, समाजमंदिर, ग्रामपंचायत अशा सर्व आवश्यक इमारती येथे बांधण्यात आल्या. यातून अतिशय टुमदार, हिल स्टेशनसारखे नवीन माळीण उभे राहिले.
चौकट
माळीण दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी दि. ३१ जुलै २०१४ रोजी शरद पवार आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अनेक गावे डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहेत. माळीण दुर्घटनेप्रमाणे येथेही अशा घटना घडू शकतात. माळीणमधून आपण बोध घेऊन बाकी ठिकाणच्या दुर्घटना रोखण्यासाठी या गावांचे पुनर्वसन अथवा येथे बचावात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने याबाबत विचार करावा. याला विरोध होईल. मात्र, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेणे आवश्यक आहे. आज त्यांचे म्हणणे खरे ठरत आहे. धोकादायक गावे निश्चित करून त्यांचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे.
29072021-ॅँङ्म-ि02 - नवीन माळीणचे पुनर्वसन
29072021-ॅँङ्म-ि03 - नवीन माळीण पुनर्वसनात बांधून देण्यात आलेली घरे.