पुणे :
फिनिक्स मॉल प्रशासनाने माझाच नव्हे तर माझ्या जात बांधवांचा अपमान केला आहे.सर्वत्र आमच्याबद्दल चर्चा सुरु झाली असून त्यांनी सार्वजनिक स्तरावर आणलेल्या या मुद्द्यावर आता सार्वजनिक स्तरावरच माफी मागायला हवी असे मत सोनाली दळवी यांनी व्यक्त केले.तृतीयपंथी आहे म्हणून प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये घडली. सोनाली दळवी यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसिद्ध झाला. त्यावर आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून आम्ही सोनाली यांच्या लढ्यात त्यांच्या सोबत असल्याचे सांगत त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. सोनाली यांनी लोकमतशी बोलताना मी ही लढाई कायदेशीर मार्गाने लढणार आहे असे सांगितले. काही तृतीयपंथीयांकडून त्रास झाला, त्यामुळे मला अशी वागणूक दिली असे मॉल प्रशासनाचे म्हणणे असेल तर जेव्हा काही सामान्य स्त्री पुरुष जेव्हा त्रास देतात तेव्हा ते कारण दाखवून इतर स्त्री पुरुषांनाही प्रवेश नाकारला जातो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एकीकडे सुरक्षा यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे देशात अतिरेकी हल्ले झाल्याचे उदाहरणे समोर असताना आपलेच बांधव असलेल्या तृतीयपंथीयांना मात्र साध्या मॉलमध्ये प्रवेश नाकारला जातो असे सांगत समाजाच्या सर्व स्तरावरून पुण्यात घडलेल्या घटनेवर संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही याविषयी लोकमतकडे नाराजी प्रदर्शित केलं असून संविधानाने भारतीयांना सर्वत्र संचाराचा अधिकार दिला आहे.अशावेळी लैगिकता लक्षात घेवून कोणी त्यांना नाकारणे चुकीचे आहे. आज देशात न्यायाधीशब पदापासून अनेक ठिकाणी तृतीयपंथी महिला काम करत असून त्यांना अधिक वागणूक देणे खेदजनक असल्याचे त्या म्हणाल्या. स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी बोलताना माणसाने माणुसकीचा विचार न करता केलेली ही कृती मानायला हवी असे म्हटले.तृतीयपंथीय व्यक्तीला हे नियम कुणी लावले, का लावले याचा जाब विचारला पाहिजे. त्यांच्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.ती व्यक्ती उच्चशिक्षित असून त्याला प्रदेश नाकारणे अतिशय चुकीचे आहे असेही त्या म्हणाल्या. शिक्षिका गौरी गोसावी यांनी हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे सांगितले. मुळात समाजात तृतीयपंथियांविषयी गैरसमज असून ते पहिल्यांदा दूर करण्याची गरज आहे. त्यांना समाज माणूस म्हणून स्वीकारले तेव्हा हे सर्व प्रकार बंद होतील.