इंदापूर : वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन व हजरत चाँदशाहवली दर्गाह संवर्धन व सुशोभीकरणासंदर्भातील आराखडे वित्त व नियोजन विभागाकडे सादर करावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (दि. ३१) जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आ. दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांना दिली.
या कामासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, अशी ग्वाही पवार यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पुण्याच्या नियोजित आराखड्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी मुंबईच्या सह्याद्री शासकीय अतिथीगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व आपल्या उपस्थितीत वित्त विभागाचे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी व व्हीसीद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांची बैठक झाली.
या बैठकीत बोलताना गढीचे संवर्धन करून जुने बुरुज, गाव वेशीसह ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणे, गढीलगतच्या हजरत चाँदशाहवली बाबांच्या दर्गाह परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश पवार यांनी दिले. आपल्या पूर्वजांचा इतिहास नव्या पिढीला कळावा, यासाठी पुरातत्त्व विभागाकडून इतिहासाची माहिती घेऊन त्याचा संपूर्ण आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी तयार करून शासनाकडे सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली, असे आ. भरणे यांनी स्पष्ट केले.