बारामती : अभ्यास करीत नसलेल्या भाच्यांवर मामा रागावला. मामाच्या रागावण्याचा भाच्यांना रागच आला. त्यातून बारामती शहरा लगतच्या गुणवडी(ता.बारामती)येथील चक्क पाच भाच्यांनी घर सोडले, शिवाय स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला. मात्र, शहर पोलीसांनी हा प्रकार गांभीर्याने मामावर रागावुन घर सोडलेल्या मुलांचा शोध घेण्यात यश आले.
गुणवडी गावातून चार मुली आणि एका मुलासह पाचजण सोमवारी(दि २२) सकाळी १०.०० वाजल्यापासून गायब झाल्याची माहिती माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, तुषार चव्हाण, अक्षय सीताप, शाहू राणे यांना तातडीने तपास करण्याच्या सुचना दिल्या. ग्रामस्थांसह पोलीस पाटील यांच्या मदतीने पोलिसांनी चोहो बाजूने तपास सुरू केला.
दरम्यान, मेखळी या ठिकाणी एका दुकानदाराने ती पाच भावंडे पाहिल्याचे सांगितले .ते वालचंद नगरचा रस्ता विचारत असल्याचे सांगितले. पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेत सायंकाळी ७ वाजता वालचंद नगर जंक्शन येथे दोन मुली प्रथम सापडल्या. या मुलींनी पोलीस नातेवाईक रागावण्याच्या भीतीने अपहरणाचा बनाव रचला. ओमनी गाडीत घालून त्यांना मामाकडे भेटायला घेऊन जातोय, असे सांगून गाडीत बसवले. त्यांना वालचंद नगरच्या दिशेने आणत त्यांना त्या ठिकाणी सोडल्याची हकीकत सांगितली. ही माहिती ऐकल्यानंतर पोलिसांच्या चिंतेत भर पडली.
पोलिसांनी शोध मोहीम आणखी तीव्र केली. काही वेळानंतर त्याच भागामध्ये आणखी दोन मुली मिळून आल्या. त्या सर्व मुलांना विचारात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्या मुलांनी त्यांना कोणीही ओमनी गाडीतून अपहरण केलेले नाही ,तर त्यांचा मामा ही सर्व मुले अभ्यास करत नसल्याने रागवतो. त्यामुळे सर्वांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतल्याची कबुुली दिली. पोलीस आणि नातेवाईक रागावतील म्हणून त्यांनी या प्रकारचा बनाव केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांना उर्वरीत मुलगा देखील सापडला. सोमवारी रात्री साडेआठनंतर दोन बहिण भावंडांसह सख्ख्या तिघी बहिणींसह पाच जणांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. त्या सर्व बालकांच्या दोघी आई ह्या सख्या बहिणी आहेत. त्या दोघी सकाळी दवाखान्यात दहा वाजता बारामतीला आलेले असताना सर्व मुलांनी घरातून जाण्याचा निर्णय घेतला. सोबत कपडे व पिशवी घेत सर्वजण घराबाहेर पडले. नंतर ट्रकचालकाला विनंती करून वालचंद नगर जंक्शनला उतरले. पोलिसांनी शिताफीने तपास केल्याने सर्व मुलांचा वेळेत शोध लागला. अप्पर पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पुर्ण करण्यात आला.