पुणे : दहा वर्षांच्या भाचीवर मामानेच बलात्कार केला. याप्रकरणी न्यायालयाने मामाला चौदा वर्षे सक्तमजुरी आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश आर. यू. मालवणकर यांनी हा आदेश दिला. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
हडपसर भागात ११ डिसेंबर २०१६ रोजी ही घटना घडली. आरोपी २५ वर्षांचा आहे. याबाबत घराच्या शेजारी राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने पोलिसात फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या घराशेजारी आरोपी आई, बहिणीच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. घटनेपूर्वी आठ दिवसच तो तिथे राहायला आला होता.
नळाला पाणी आल्याबाबत सांगण्यासाठी फिर्यादी आरोपीच्या घरी गेली. आरोपीने दरवाजा उघडला. त्या वेळी त्याची दहा वर्षांची भाची घाबरून रडत-रडत घराबाहेर पडली. फिर्यादीने याबाबत तिला घरी नेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली. त्या वेळी तिने मामाने बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने मुलीच्या वडिलांचा फोन नंबर मिळवून त्यांना घडलेल्या घटनेबाबत सांगितले. घटनास्थळी ते दाखल झाले. त्या वेळी त्यांच्यासह शेजाऱ्यांनी आरोपीला घराबाहेर काढत मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. मुलीच्या वैद्यकीय तपासणीत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे सिध्द झाले. पीडितेचा जबाब आणि वैद्यकीय अहवाल महत्त्वपूर्ण मानत न्यायालयाने बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांनुसार दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. या घटनेचा तपास हडपसर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रुपाली माळी यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कर्मचारी ए. एस. गायकवाड यांनी मदत केली.
------------------------------