पुणे- बियरच्या बाटल्या डोक्यात फोडून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह प्लस व्हॅलीच्या दरीत फेकून दिल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पौड पोलिसांनी अटक केलेल्या एकाला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
सागर खोपडे (वय २९) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात यापूर्वी एकाला अटक करण्यात आली असून, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दीपक चव्हाण (वय ३३) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत ३१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. ४ एप्रिल रोजी पुणे-माणगाव रोडवरील प्लस व्हॅलीच्या परिसरात ही घटना घडली.
दीपक आणि सागर यांच्यात वाद झाला. त्याने दीपक यांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने त्याचा मृतदेह प्लस व्हॅलीच्या दरीत फेकून देण्यात आला. तसेच त्यांचा मोबाईल फोन फोडून झाडीत फेकून दिला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सागर याला न्यायालयात सादर केले असता, नक्की कोणत्या कारणासाठी खून करण्यात आला, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का? यासह गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.