पुणे : दारूच्या दुकानात पैशाच्या वादातून दुकानदारावर सुरीने गालावर, हातावर व पोटावर वार करून जबर जखमी करणाऱ्र्या एकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुसेन अकील कुरेशी (रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर नसीर अहमद अकील कुरेशी आणि अजहर कुरेशी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील कॅफे कॅनडा हॉटेल येथे २ एप्रिल रोजी घडला. याबाबत हसन हदी तफ्ती गुलाम रिझा हदी तफ्ती (वय ४२, रा. मंगळवारपेठ) यांनी फिर्याद दिली आहे. हसन आणि आरोपी यांच्यात दारूच्या पैशांवरून दुकानात वाद झाला. तेव्हा हसन यांनी आरोपींना परत दुकानात यायचे नाही, असे म्हटले. यावरुन तिघांनी हसन यांना हाताने व सुरीने वार करुन जखमी केले.