लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन मुलाला स्मशानभूमीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन तेथे गळा दाबून जिवे मारण्याची धमकी देऊन अनैसर्गिक कृत्य करायला लावणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी अटक केली.
रवींद्र ऊर्फ बल्ली कांबळे (वय ३२, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा प्रकार सेव्हन लव्हज चौक पूल ते पूनावाला गार्डन येथील स्मशानभूमीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये मंगळवारी सकाळी घडला. याप्रकरणी एका १५ वर्षांच्या मुलाने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कांबळे याने या दोन मुलांना नाष्टा करण्याच्या बहाण्याने सेव्हन लव्हज चौकातून मोटारसायकलवर बसवून पूनावाला गार्डन येथील स्मशानभूमीजवळ नेले. तेथे त्यांच्यातील एकाला त्याने दारू आणण्यासाठी पाठविले. त्यानंतर त्याने या अल्पवयीन मुलाला अनैसर्गिक कृत्य करायला सांगितले. या मुलाने त्याला विरोध केल्यावर त्याचा गळा दाबून केस ओढले. मी सांगतो तसे केले नाही तर तुला मारून स्मशानभूमीत पुरेन, अशी धमकी दिली. जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याचा गळा दाबून केस ओढले व त्याला अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडले.
स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडणे, पोक्सो अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून रवींद्र कांबळे याला अटक केली आहे.