बाभुळगाव : वरकुटे खुर्द (ता.इंदापूर) येथे ज्वारीचे शेतात पिकाची राखण करणार्या महिलेचा विनयभंग करणारा राजाराम लक्ष्मण शेंडे (वय ७५, रा.वरकुटे खुर्द, ता.इंदापूर,जि.पुणे) याला महिलेचा विनयभंग प्रकरणी इंदापूर सहदिवाणी न्यायालयाने दोषी ठरविले आहे. आरोपीला सहा महिने साधा कारावास व २ हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. एका महिला आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचा निकाल इंदापूर सहदिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एन.ए.शेख यांच्या कोर्टाने दिला आहे.
वरकुटे खुर्द (ता.इंदापूर) येथे २४ फेब्रुवारी २०१४ रोजी ज्वारीच्या शेतात विनयभंगाची घटना घडली होती. यामध्ये पीडित महिलेने वरील दोन आरोपी विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा.हवालदार एस.एन.शेख यांनी करून आरोपी विरोधात इंदापूर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात सरकार पक्षाच्या वतीने चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील तीन साक्षीदारांची साक्ष महत्वाची ठरल्याने कोर्टाने आरोपीला दोषी ठरवुन शिक्षा सुनावली.
न्यायालयाने या गुन्ह्यातील आरोपीला कलम ३५४ अन्वये दोषी ठरविले असून त्याला सहा महिन्यांचा साधा कारावास व २ हजार रू.दंड ठोठावला आहे.तर त्याच गुन्ह्यातील कलम ५०६ मध्ये आरोपीला दोषी ठरवुन तीन महिने साधा कारावास व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर आरोपीला मदत करणार्या एक महिलेची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड.अमर लोहकरे यांनी कामकाज पाहिले.तर महिला पोलीस नाईक एस.एन पारेकर यांनी कोर्ट कामकाज पूर्ण केले.