पुणे : देवराई म्हणजे देवासाठी सोडलेले जंगल किंवा हिरवागार वनाचा तुकडा होय; पण आता विकासाच्या नावाखाली देवराई कमी होत आहेत. मात्र, पुणे शहरात ते देखील भुगावमध्ये तुम्हाला मानवनिर्मित देवराईचे दर्शन होऊ शकते. या देवराईचा अनुभव घेऊ शकता. विठ्ठल पाटील व पल्लवी पाटील या दाम्पत्याने आपल्या गॅलरीमध्ये चक्क देवराई साकारली आहे. यामध्ये शंभरहून अधिक वनस्पती, वृक्षांचा समावेश आहे.
भुगाव येथील माऊंटव्हर्ट बिलेअर सोसायटीमध्ये पाटील कुटुंबीय राहतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून ते या ठिकाणी आले आहेत. त्यांचे पहिल्या मजल्यावर घर असून, गॅलरीत तीन-चार वर्षांपासून मानवनिर्मित देवराई साकारली आहे.
या देवराईविषयी विठ्ठल पाटील म्हणाले, ‘‘मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतीची आवड होतीच. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून, एका खासगी कंपनीत काम करीत आहे. मी या घरात राहायला आलो, तेव्हा बिल्डरने आम्हाला गॅलरीमध्ये लॉनची सुविधा करून दिलेली होती. सुमारे १७५० स्क्वेअर फुटांची गॅलरी आहे. त्या ठिकाणी मोठी जागा पाहून झाडे लावली. माझी पत्नी पल्लवी हिने त्याला साथ दिली. त्यानंतर आम्ही लॉन काढून त्या ठिकाणी एक फुटापर्यंत काळी माती टाकली. त्यात केळी, ऊस, तुळस, पपई, अडुळसा अशा वनस्पती आणि झाडे लावायला सुरुवात केली. हळूहळू या ठिकाणी चांगली झाडी निर्माण झाली. आतापर्यंत आम्ही शंभरहून अधिक वनस्पती येथे लावल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये सोसायटीतील अनेकांना औषधांसाठी काही पानं लागत होती. ती त्यांना आमच्या देवराईमधून मिळाली.’’
घरातील ओला व सुका कचरा या झाडांसाठी वापरला जातो. त्यामुळे घराबाहेर कचरा जात नाही. तसेच झाडांना चांगले कंपोस्ट खतही मिळते.
————————————-
या वनस्पतींना बहर
जास्वंद, देशी गुलाब, अबोली, सदाफुली, गुळवेल, कृष्णतुळस, रान तुळस, सुगंधी तुळस, वेलदोडा, डाळिंब, अंजीर, कुयरी, मोगरा, सोनटक्का, निरगुडी, आंबेहळद, घेवडा, अळूचे काही प्रकार, लिंबू, शेवगा, मका, केळी, आलं, देशी भेंडी, दुधी, काळी तूर, आदी वनस्पती बहरलेल्या आहेत.
————————————
पक्ष्यांची घरटी अन् धनेशचेही दर्शन
घनदाट झाडी असल्यामुळे येथे अनेक पक्ष्यांची ये-जा सुरू असते. काही पक्ष्यांनी येथे घरटीही बांधली आहेत. तसेच फक्त घनदाट झाडी असलेल्या ठिकाणी राहणारा धनेश म्हणजे ग्रे हॉर्नबिल देखील येथे येऊन गेल्याचे पाटील यांनी सांगितले. या पक्ष्यांमुळे अनेक वनस्पतींची त्यांच्या विष्ठेतून लागवड झाली आहे. मुंग्यांनी वारूळही बनवले आहे.
—————————
फोटो - देरवाई -१
देवराई -२