चाकण : बेकायदा गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील युवकास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली आहे. आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेमुळे महाळुंगे गावात तणावाचे वातावरण आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल अनिल लोंढे (वय २०, रा. बौध्द वस्ती, महाळुंगे इंगळे, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक अंकुश शिवाजी माने व त्यांच्या पथकातील पोलीस संतोष मोरे, बांबळे, सपकाळ, साळुंके व शिलेदार यांनी काल (दि. २१) रोजी चाकण एमआयडीसीत पेट्रोलींग करीत असताना सायंकाळी ७ वा. १० मि. च्या सुमारास येथील सद्गुरुनगर मधील सर्वेश जिमकडे जाणाऱ्या रोडवर या तरुणाला फिरताना पाहिले व त्याच्याकडे जिवंत काडतुसासह एका काळ्या रंगाचे पिस्तुल मिळाले. त्याच्यावर मेड इन यूएसए असे इंग्रजीत लिहिले होते. परवाची घटना ताजी असतानाच आज पिस्तुल आढळल्याने गावात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यादव तपास करीत आहेत.(वार्ताहर)
पिस्तूल बाळगणाऱ्या युवकास अटक
By admin | Published: April 23, 2015 6:29 AM