- किरण शिंदे
पुणे - पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाणेर परिसरातील एका हॉटेल राहण्यासाठी आलेल्या पती-पत्नीत वाद झाला. आणि त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकूचे वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःच्याही गळ्यावर आणि पोटामध्ये चाकू खुपसून घेतला. या घटनेत दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. चतु: शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमजद युसुफ मुल्ला (वय ३९, रा. विष्णुनगर चेंबूर, मुंबई) असे वार करणाऱ्या पतीचे नाव आहे. तर नसीमा मुल्ला या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. सध्या दोघेही रुग्णालयात असून दोघांवरही उपचार सुरू आहेत. अमजद मुल्ला याच्याविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमजद मुल्ला हा टेम्पो चालक आहे. मागील काही दिवसांपासून त्याचे पत्नीसोबत वाद सुरू होते. दरम्यान पुण्यातील बाणेर परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी दोघे पती-पत्नी आले होते. बाणेर परिसरातीलच एका हॉटेलमध्ये दोघे उतरले होते. दरम्यान हॉटेलमध्ये दोघा पती-पत्नीत वाद झाला आणि त्यानंतर आरोपी पतीने चाकूने पतिने नसीमावर वार केले. दरम्यान पती चाकूने वार करत असताना नसीमा हॉटेलच्या खाली पळत आली आणि रक्ताच्या थारोळात खाली कोसळली. पतीने आपल्यावर वारकरी असून त्याने स्वतःचाही गळा कापून घेतल्याची तिने हॉटेलमधील कामगारांना सांगितले.
त्यानंतर हॉटेलमधील कामगारांनी रूम मध्ये जाऊन पाहिले असता अमजद मुल्ला हा गंभीर अवस्थेत खाली कोसळला होता. त्याने स्वतःचा गळा कापून घेतला असून पोटातही चाकू खूप खूपसून घेतला होता. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हॉटेलमधील सफाई कामगार गणेश कचरू लंके यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.