- रविकिरण सासवडे- बारामती : आषाढी वारी सोहळा रद्द झाला म्हणून काय झालं घराण्याची शेकडो वर्षाची परंपरा कशी मोडणार? गर्दी होऊ नये, आजार पसरू नये म्हणून तर त्या (फिजिकल डिस्टन्स) नियमांचे पालन करीत एकटाच पंढरीची वाट चालतोय. रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे “ ऐसे असावे सख्यात्व, विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व, सांडोचि नये”, अशा शब्दात 62 वर्षाचे भरत वामन वनवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सासवड येथील संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळा प्रस्थानानंतर भरत वनवे यांनी एकट्यानेच पंढरपूरच्या दिशेने पायी वारी सुरू केली. पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर ते पाचव्या दिवशी बारामती शहरात पोहचले. कपाळावर अबीरबुक्का, तोंडाला मास्क, खांद्यावर भगवी पताका, पाठीवर दोन पिशव्या बांधून मुखाने अखंड ‘राम कृष्ण हरी’ जयघोष करीत भरत वनवे हिमतीने पंढरपूरची वाट चालत आहेत. वारीसोहळा रद्द झाला तरी तुम्ही एकट्यानेच वारी का करताय, असे विचारले असता ते म्हणाले ‘ माझ्या घराण्यामध्ये महिन्याच्या वारीची परंपरा आहे. माझ्या आजोबापासून ती सुरू झाली. मी केंव्हा वारी सुरू केली हे मला सुद्धा आठवत नाही. यंदा वारी करताना आजराची भीती सगळीकडे आहे. त्यामुळं ठरवलं एकट्यानेच वारी करायची संगती कोणाला घ्यायचं नाही. संकल्प सोडला आणि निघालो. आतापर्यंत तरी सगळं विठ्ठलकृपेने व्यवस्थित पार पडलाय. येथून पुढेसुद्धा तोच तारून नेईल असा विश्वास भरत वनवे व्यक्त करतात.
….................
वारीमध्ये विठ्ठल भेटतो... भरत वनवे हे पंढरपूर येथील रहिवाशी आहेत. दर महिन्याला ते सासवड येथे संत सोपानकाका यांच्या संजीवन समाधी दर्शनास येतात. यंदा आषाढी वारी सोहळ्यासाठी ते पायी सासवडहून पंढरपूरकडे निघाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आहार आणि निवाऱ्याची सोय कशी करता असे विचारले असता, ते म्हणाले, बाळा वारीत विठ्ठल भेटतो. कधी निवाऱ्याच्या रूपाने तर कधी आहाराच्या रूपाने. खुप वर्षांच्या परिचयामुळे या वाटेनं अनेक ऋणानुबंध जोडले गेलेत. अशा आजार काळातसुद्धा कोणी तिरस्कार केला नाही. प्रत्येक घरातील माऊलीने हसतमुखाने जेऊ घातले. बाबा पुढील मुक्कामाला तुम्हाला गाडीवरून सोडतो, असे म्हणल्यावर त्यांनी नम्रपणे नकार देत टाळाच्या ठेक्यात आणि अखंड नामघोष करीत आपली वाट धरली.