पुणे : सावनी रवींद्र हिला ‘बार्डो’ चित्रपटासाठी सर्वोत्क्ृष्ट गायिका तर अक्षय इंडीकरच्या ‘त्रिज्या’ चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइनचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याशिवाय नियाज मुजावरच्या ’ताजमहल’ चित्रपटाला ’बेस्ट फिल्म आॅन नँशनल इंटीग्रेशन’ या विभागात तर ’कस्तुरी’ साठी दिग्दर्शक विनोद कांबळे यांना देखील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, मूळचे सोलापूरचे रहिवासी ़असलेले हे दोघेही एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आहेत.
नवी दिल्ली येथे (दि. २२) ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये पुण्यासह सोलापूरच्या दोन माजी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची निवड झाल्याने पुणेकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली.
----------------------------------
आमच्या चित्रपटाला कधी राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईनसाठी मिळाला आहे. खूप भारी वाटत आहे. हा पुरस्कार म्हणजे चांगल्या चित्रपटांना मिळणारी पोचपावती असते. यापूर्वीही माझ्या एका चित्रपटाला आशियातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. नुकताच ‘स्थलपुराण’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनुराग कश्यप यांनी हा चित्रपट पहिल्यानंतर त्याचे कौतुक केले. त्याच आनंदात असताना या राष्ट्रीय पुरस्काराची बातमी मिळाली. त्यामुळे सध्या दुहेरी आनंदात आहोत-- अक्षय इंडीकर, त्रिज्या दिग्दर्शक
-----------------------------------
पुण्यात आयएलएस विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. तेव्हा आमच्या महाविद्यालयाने पुरूषोत्तम करंडक जिंकला होता. त्या नाटकासाठी मला ‘जयराम हर्डीकर करंडक’ मिळाला होता. पुण्यातूनच कलेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्यानंतर एफटीआयआयमध्ये पटकथा लेखनाचा कोर्स केला. आपण जे काम करू त्याच्यावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर कधीतरी उमटावी. त्या चित्रपटांच्या मांदियाळीमध्ये आपला चित्रपट असावा ही इच्छा होतीच. ती आज पूर्ण झाली. जो विचार घेऊन सोलापुरातून प्रवास सुरू केला तो राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचला याचा आनंद आहे. त्यामुळे आता जबाबदारी खूप वाढली आहे असे वाटते.
-नियाज मुजावर, दिग्दर्शक-पटकथा लेखक
---------------------------------
कस्तुरी या पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे खूप भारावून टाकणारे आहे. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट (बालचित्रपटासाठी सुवर्णकमळ) म्हणून देशपातळीवर नोंद घेतल्याने कामाचा हुरूप वाढला आहे. एफटीआयआयमध्ये चित्रपट रसास्वादाचे प्रशिक्षण घेतले असून, चित्रपटाचे कोणतेही तांत्रिक शिक्षण न घेता विविध चित्रपटाच्या कामातून शिकत गेलो. संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण बार्शी, सोलापूर या भागातले असून कलाकारही स्थानिक आहेत.
-विनोद कांबळे, दिग्दर्शक
-------