पुणे : निर्धारित वेळेत श्रींची मिरवणूक पूर्ण व्हावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. यंदाच्या वर्षी शहरातील मानाच्या पाचही गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी एकत्र येऊन मिरवणूक कमी कालावधीत पूर्ण करणार असल्याचा निर्धार केला आहे. यामुळे सहा तासांपेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या मिरवणुका यावर्षी किती तासांत पूर्ण होतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मानाच्या पाचही गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक सुंदर आणि वेळेत पार पडावी, याकरिता मानाचा दुसरा गणपती असलेल्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या उत्सव मंडपात आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे राजाभाऊ टिकार, सौरभ धडफळे, गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळाचे विवेक खटावकर, नितीन पंडित यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रविवारी (दि. २३) सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री, महापौर, आयुक्त आदी मान्यवरांच्या हस्ते गणरायाचे पूजन झाल्यानंतर प्रत्येक मानाच्या मंडळाचा गणपती १५ मिनिटाच्या अंतराने पुढे मार्गस्थ व्हावा, असा प्रयत्न यंदा राहणार आहे, असे मानाच्या पाच मंडळांच्या पदाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शेटे म्हणाले, की मंडई टिळक पुतळ्यापासून ते बेलबाग चौकापर्यंत मानाच्या गणपती मंडळांना येण्याकरिता जो वेळ लागतो, तो यंदा कमी करण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याकरिता ढोल-ताशा पथके लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या बाजूला सज्ज राहणार असून तेथून बेलबाग चौकातच ती पथके मिरवणुकीत सहभागी होतील. यामुळे मंडई ते बेलबाग चौकादरम्यान लागणारा जादा वेळ कमी होणार आहे. एका पथकात ४० ढोल, १५ ताशे, १० ध्वजधारी आणि ३० जादा वादक असा ताफा असणार आहे. धडफळे म्हणाले, की मानाच्या गणपतींचे विसर्जन हौदात करण्याचा पायंडा पाडला होता. यंदादेखील तो पायंडा कायम ठेवणार असून मानाच्या गणपतीचे विसर्जन हौदात होणार आहे. पृथ्वीराज परदेशी म्हणाले, की ढोल-ताशा पथके हा मंडळांचा एक भाग आहेत. ढोल-ताशा पथके पुढे लवकरात लवकर जातील, असा प्रयत्न आहे. मात्र, पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये, असेही ते म्हणाले. खटावकर म्हणाले, की ढोल-ताशा पथकांचा सहभाग असला, तरी संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. पथकाचे पहिले आवर्तन हे टिळक पुतळ्याजवळ नाही, तर बेलबाग चौकामध्ये होईल.
* कसे असणार नियोजन... - मानाच्या पहिल्या कसबा गणपतीनंतर १५ मिनिटांनंतर लगेच मानाचा दुसरा गणपती हा विसर्जन मिरवणुकीत येणार आहे़ तसेच ढोल पथकांची लक्ष्मी रोडवर होणारी आर्वतने ही कमी वेळेची करण्यात आली आहेत. त्याचबरोबर मिरवणुकीतील सर्व पथके ही समाधान चौकापासून मिरवणुकीत सहभागी होणार. - यंदापासून मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोलपथके समाधान चौकातून सहभागी केली जाणार- ढोल पथकांसाठी आता दहा मिनिटांच्याऐवजी तीन मिनिटांचा अवधी निश्चित करण्यात आला आहे़ यामुळे कमीत कमी वेळेत मिरवणूक पूर्ण होण्यास मदत होईल, असे पदाधिकाºयांनी म्हटले आहे. - ढोलवादकांना लक्ष्मी रस्त्यावरील एकाही चौकात रिंगण करून ढोलवादन करता येणार नाही.