व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये, तंत्रज्ञान व्यवस्थापन, वितरण व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन अशा पारंपरिक क्षेत्रांना तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक माणुसकीने आणि माणूस समजून घेणारे तसेच प्रत्यक्ष भेटी कमीत कमी झाल्या तरी कामाची आणि सेवेची गुणवत्ता कुठेही कमी होणार नाही, अशी खात्री ग्राहकाच्या मनामध्ये निर्माण करणारे व्यवस्थापक सध्या उद्योग व्यवसायाला हवे आहेत.
काळ आणि काळाचे परिमाण वेगाने बदलत आहे. ‘मार्केट’ची संकल्पना बदलते आहे. व्हर्च्युअल माध्यमांचा वापर करून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण उपाययोजनांची अंमलबजावणी करणारा, खुल्या मनाने बदल स्वीकारणारा व्यवस्थापक आता आवश्यक आहे. त्यामुळे ज्ञानाचा मर्यादित वापर न करता व्यवस्थापकीय कौशल्य आत्मसात करून यातून रिझल्ट ओरिएन्टेड, सुव्यवस्थित, खात्रीशीर, दर्जेदार काम करणारा सेल्फ-मोटीवेटेड, असा परिपूर्ण व्यवस्थापक निश्चितपणे उद्योगजगताला हवा आहे. पूर्णवेळ अभ्यासक्रम शिकून एमबीए होणाऱ्या विद्यार्थ्यांना सप्लाय आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थापन, तंत्रज्ञान व्यवस्थापन, इनोवेशन मॅनेजमेंट, व्हर्चुअल ऑफिस मॅनेजमेंट, मल्टिपल लोकेशन मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट, हेल्थ केअर मॅनेजमेंट, अशा नव्याने निर्माण होणाऱ्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी निश्चितपणे उपलब्ध आहे.
आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कामकाजाचे आणि संवादाचे स्वरूप हे तंत्रज्ञानावर आधारित झाले आहे. त्यामुळे विकसित होणारी नवनवीन तंत्र आणि तंत्रज्ञान शिकून आत्मसात करणे आणि त्याचा सुयोग्य वापर करून व्यवसायाचे व्यवस्थापन सांभाळणे ही कला आहे. आर्थिक व्यवहार, व्यावसायिक व्यवहार, तसेच अंतर्गत व्यावसायिक संवाद तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंट, पेशंट केयर मॅनेजमेंट, हेल्थ केअर मॅनेजमेंट अशा मोठ्या प्रमाणावर तज्ञ व्यवस्थापकांची गरज भासणाऱ्या आस्थापनांची संख्या खूप मोठी आहे.
मोठे रस्ते, मेट्रो, महामार्ग, असे अनेक प्रोजेक्ट ज्यामध्ये शासन, प्रशासन आंतरराष्ट्रीय बँका, स्थानिक नागरिक अशा अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात, या सर्व प्रकल्पांचे सुरुवातीपासून अत्यंत व्यावसायिक पद्धतीने नियोजन, अंमलबजावणी, वेळेचे व्यवस्थापन तसेच डिझास्टर मॅनेजमेंट अशा व्यवस्थापकीय कौशल्य असणाऱ्या व्यवस्थापकांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासणार आहे. मोठे व्यावसायिक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही त्यांचे दैनंदिन व्यवस्थापन, देखभाल तसेच प्रकल्प पूर्व आणि पश्चात आर्थिक व्यवस्थापन बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आवश्यक आहे.
एअरपोर्ट ट्रान्सपोर्ट हब, शेतमाल भाजीपाला यांचे मोठ्याप्रमाणावर स्टोरेज व्यवस्थापन. हजारोंच्या संख्येने घरी असणाऱ्या एखाद्या संकुलाचे व्यवस्थापन असे सर्व सांभाळण्यासाठी व्यवस्थापकीय कौशल्य असणाऱ्या व्यक्तीची कायमस्वरूपी गरज असते. मात्र, या पुढील काळात पारंपरिक पद्धतीच्या नोकऱ्या मिळणार नाहीत. दिलेले काम स्वत:हून वेळेत आणि अचूक पद्धतीने करण्याची कला साध्य आहे, अशाच व्यवस्थापकीय कौशल्य असणऱ्या व्यक्तींना संधी मिळणार आहे. सद्यस्थितीतही उद्योगजगतामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वयंप्रेरित आणि कौशल्य असलेल्या प्रामाणिक व्यवस्थापकांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यामुळे नोकरी काय आणि कोठे मिळेल? याची चिंता न करता क्षमता विकास करणे जास्त महत्त्वाचे आहे. माझे गुण माझी कौशल्य फक्त कागदावर असून उपयोग नाही तर; ती प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता आली पाहिजे. याची या क्षेत्रात असणाऱ्यांनी या येऊ पाहणाऱ्यांनी नोंद घेतली पाहिजे.
- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ