पुणे : कर्जासाठी तारण ठेवलेले सोने कर्जाची परतफेड झालेली नसताना कर्जदारांना परस्पर परत करून भोर शहरातील सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेची २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या तत्कालीन प्रभारी व्यवस्थापकाचा जामीन न्यायालयाने फेटाळला.
दत्तात्रय नारायण दरेकर (वय ६९) असे या तत्कालीन व्यवस्थापकाचे नाव आहे. विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा आदेश दिला.
या प्रकरणात दरेकर याच्यासह सतीश किसन शेटे, संदीप वसंत बोडके (सर्व रा. भोर) व बँकेच्या तत्कालीन स्वीकृत संचालकावर भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष जयाजी यशवंत शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २०११ ते २०१४ दरम्यान घडली.
सतीश शेटे व संदीप बोडके यांनी सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेकडे पावणेचार किलो वजनाचे सोने तारण ठेवून त्यावर ८९ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. संस्थेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने शेटे याने पतसंस्थेचे तत्कालीन प्रभारी व्यवस्थापक दरेकर व तत्कालीन स्वीकृत संचालकाच्या साथीने अपुरा निधी असताना ९० लाख रुपयांचा धनादेश पतसंस्थेला दिला. त्यावर दरेकर यांनी कर्ज व व्याजाची परतफेड झालेली नसतानाही संस्थेकडे तारण असलेले सोने परस्पर शेटे व बोडके यांच्या ताब्यात दिले. त्यामुळे संस्थेची २ कोटी ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दत्तात्रय दरेकरने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्याला सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी विरोध केला. अर्जदार आरोपीने गुन्हा कबूल केला असून, पतसंस्थेकडे तारण सोने आरोपी शेटेच्या ताब्यात दिल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे. तारण ठेवलेले सोने मिळाल्यानेच शेटे व बोडके यांनी मूळ कर्ज व व्याजाची परतफेड पतसंस्थेस केलेली नाही. या प्रकरणात शेटे व बोडके यांना अटक करायची असून, त्यांनी अपहार केलेले सोने व कर्ज रक्कम हस्तगत करायची आहे. अर्जदार आरोपीला जामीन मंजूर झाल्यास या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो, तसेच साक्षीदार, सोने, कर्ज रक्कम, आदी पुराव्याचे मुद्दे प्रभावित करून पतसंस्थेचे व पर्यायाने ठेवीदारांचे नुकसान करण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील वाडेकर यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.