हडपसर : नोटा बदलून घेण्यासाठी तासन्तास रांगेत थांबूनसुद्धा कॅश बँकेत कमी उपलब्ध होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. खर्चायला पैसे नसल्याने कामावर सुट्टी काढून दिवसभर रांगेत उभे राहून सुद्धा नोटा बदलून न मिळाल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. फुरसुंगी येथील विश्वेश्वर बँकेत गेले तीन दिवस पैसेच आले नसल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे. तर काही बँकांत कमी पैसे आल्याने सकाळपासूनच रांगेत उभे राहिलेल्यांना दुपारी मोकळ्या हातीने घरी जावे लागत आहे.घरातील खर्चासाठी नागरिकांना पैसे बदलून आणण्याशिवाय आता पर्याय राहिला नाही. प्रत्येक ठिकाणी ५०० व १०००च्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत या आशयाचे फलक पाहण्यास मिळत आहेत. पेट्रोलपंपावर ५००चे पेट्रोल घ्या, नाहीतर ५०० सुट्टे होईपर्यंत पंपावर इतर ग्राहकांची वाट पाहात थांबा, अशा सूचना मिळतात. दोनशेचे पेट्रोल टाकले आणि ५००ची नोट दिली तर ३०० रुपये जमा होईपर्यंत पंपावर थांबावे लागते. अशांचीही रांग आता पंपावर लागत आहे. जनसेवा बँक, बारामती बँक, साधना बँक या बँकांमध्ये नोटा बदलून मिळत आहेत. मात्र कमी कॅश येत असल्याने ती पुरेशी नाही. विश्वेश्वर बँकेच्या फुरसुंगी शाखेत गेल्या तीन दिवसांपासून पैसेच नाहीत. त्यामुळे खातेदारांनी संताप व्यक्त केला आहे. (वार्ताहर)
रांगेत थांबूनही मनस्तापच
By admin | Published: November 18, 2016 6:22 AM